पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि तत्कालीन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून १९५६ मध्ये बी.एस्सी, आणि १९५७ मध्ये पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यांनी भौतिकशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. १९८८-१९८९ या कालावधीत त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले होते. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते.

त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण केले; तर भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पुणे विद्यापीठात (सध्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) घेतले. त्यानंतर त्यांनी संशोधन पदवी मास्को स्टेट विद्यापीठामधून प्राप्त केली. पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केल्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७८मध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. त्यानंतर त्यांच्याच प्रयत्नांतून १९८९मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९९६ ते १९९८ या काळात त्यांच्याकडे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याशिवाय नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशनल कौन्सिल (नॅक) या राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. राज्यातील आणि देशातील शिक्षण क्षेत्रात बदल करत दिशा देण्यात डॉ. ताकवले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Story img Loader