लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : करोनातून बरे झालेल्या ८० टक्के रुग्णांच्या घ्राणेंदियाच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचा निष्कर्ष संशोधनातून समोर आला. घ्राणेंद्रियाची क्षमता तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी अल्फॅक्टोमीटर हे उपकरण विकसित केले आहे.
विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर पुणे) डॉ. निक्सन अब्राहम यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आले. संशोधन गटात संशोधनात राजदीप भौमिक, मीनाक्षी परदासनी, सारंग महाजन, राहुल मगर, समीर जोशी, गणेश नायर, अनिंद्य भट्टाचार्य यांचा समावेश होता. तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचाही संशोधनात सहभाग होता. या संशोधनासाठी सहकार्य केले. या संशोधनाचा शोधनिबंध ‘करंट रिसर्च इन न्यूरोबायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला.
हेही वाचा… पैशाची उधळपट्टी करू नका, वायफळ खर्च करू नका: अजित पवार
घ्राणेंदियावरील परिणामाचा अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी या संशोधनात सहभागी झालेल्या दोनशे व्यक्तींची चार प्रमुख गटांत विभागणी केली. त्यात करोनाची लक्षणे नसलेले, विषाणूचे वाहक असलेले, बरे झालेले आणि निरोगी व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यानंतर प्रयोगशाळेत अल्फॅक्टोमीटर हे उपकरण विकसित करण्यात आले. या उपकरणाद्वारे त्यांची चाचणी घेण्यासाठी त्यांना दहा प्रकारचे गंध देऊन वास घेण्याच्या क्षमतेचे निरीक्षण करण्यात आले. त्यातून ८० टक्के रुग्णांच्या वास ओळखण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. अनेकांना वास ओळखता आला नाही. लक्षणे नसलेले रुग्ण आणि लक्षणे नसलेल्यांमध्ये वास ओळखण्याच्या क्षमतेत फरक दिसून आला. वासाची जाणीव असलेल्या मेंदूशी संबंधित आहे. त्यामुळे करोना संसर्गानंतर रुग्णांच्या न्यूरल सर्किट्सवर विपरीत परिणाम दिसून आले आहेत. करोनातून बरे झाल्यानंतर अनेकांमध्ये वास ओळखण्याची क्षमता पुन्हा आली आहे. तर अनेक रुग्णांना कोणताही वास ओळखता येत नाही.
हेही वाचा… पुणे: सीईटी सेलच्या ‘या’ निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा
वास घेण्याच्या संवेदनांचे अचूक प्रमाणीकरण आम्ही विकसित केलेल्या अल्फॅक्टोमीटर या उपकरणामुळे शक्य झाले. त्यामुळे करोना विषाणूच्या संसर्गामुळे घ्राणेंद्रीयांवर परिणाम होऊन निर्माण झालेल्या कमतरतांबाबत माहिती मिळू शकली. न्युरोडीजनरेटिव्ह स्थिती आणि घ्राणेंद्रीयावर परिणाम करणाऱ्या संक्रमणांची तपासणी करण्यासाठी ही पद्धत आणखी विकसित करण्यात येईल. – डॉ. निक्सन अब्राहम, शास्त्रज्ञ, आयसर, पुणे