कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार गिरीश बापट यांच्या भेटीचा फटका विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गाला बसला. पुण्यातील महात्मा फुले वस्तुसंग्रहालयात झालेल्या या भेटीसाठी पोलिसांकडून संग्रहालयात सुरू असलेला शिकवणी वर्ग तातडीने थांबवून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा- पुणे : चिंचवडमधील उमेदवारांच्या प्रचाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
खासदार गिरीश बापट आजारपणामुळे काही दिवसांपूर्वी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार आदींनी बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वीच बापट यांना घरी सोडण्यात आले. तसेच कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळीही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बापट यांची अचानक भेट घेतली. या भेटीमुळे संग्रहालयाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच पोलिसांनी संग्रहालयातील शिकवणी वर्ग थांबवण्यास सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर पडण्याची सूचना दिली.
एका विद्यार्थ्याने सांगितले, की शिकवणी वर्ग संपण्यास दहा मिनिटे होती. मात्र पोलिसांनी लगेच वर्ग मोकळे करण्यास सांगितले.