पुणे : सोरायसिस हा त्वचाविकार जगभरात कोट्यवधी जणांमध्ये आढळून येतो. हा आजार कायमस्वरुपी बरा करणारे कोणतेही उपचार सध्या नाहीत. मात्र योग्य औषधोपचारामुळे या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. याचबरोबर आधी सोरायसिसच्या औषधांचे असलेले दुष्परिणाम कमी करण्यातही यश मिळाले आहे, असे त्वचाविकारतज्ज्ञांनी सांगितले.
सध्या सोरायसिस जनजागृती महिना साजरा केला जात आहे. सोरायसिस या त्वचाविकारामुळे रुग्णांच्या दैनंदिन आयुष्यावर खूप गंभीर परिणाम होतो. यामुळे अनेक जण नैराश्यग्रस्त होतात. या पार्श्वभूमीवर त्वचाविकारतज्ज्ञांशी संवाद साधला असता त्यांनी सोरायसिसवर योग्य औषधोपचारांनी नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे सांगितले. हा एक त्वचाविकार असून, त्यामुळे आधुनिक उपचारपद्धतींचा वापर करून रुग्ण दैनंदिन आयुष्य व्यवस्थितपणे जगू शकतो. पूर्वीपासून सोरायसिसवर मलम, प्रकाशझोत उपचारपद्धतींचा वापर होत आहे. त्यांचा परिणाम मर्यादित आणि दुष्परिणाम जास्त आहेत. आता तोंडावाटे घेण्याचे औषध उपलब्ध झाली आहेत. ती अधिक प्रभावी ठरत आहेत.
हेही वाचा >>> पुणेकर हवाई प्रवाशांना खुशखबर! पुणे विमानतळाबाबत मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा
सोरायसिसवर आता पारंपरिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. त्यातून त्वचा पूर्ववत होते आणि या उपचारांचे दुष्परिणामही खूप कमी आहेत. मध्यम ते तीव्र स्वरूपाचा सोरायसिस असलेल्या रुग्णांवर हे उपचार प्रभावी ठरत आहेत. दीर्घकालीन उपचारांद्वारे रुग्ण सोरायसिस आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. त्याची त्वचा व्यवस्थित झाल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावतो. त्यामुळे तो त्याचे दैनंदिन आयुष्य व्यवस्थितपणे जगू शकतो. रुग्णावरील उपचारही अधिक सहजपणे करता येण्यासारखे झाले आहेत. याचबरोबर हे उपचार करण्याची वारंवारितही कमी असते. रुग्ण या उपचारांना सहजपणे सामोरा जातो, अशी माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयातील त्वचाविकार विभागाचे प्रमुख डॉ. शेखर प्रधान यांनी दिली.
हेही वाचा >>> पुणे : कुख्यात गुन्हेगार पिस्तूलासह जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई
सोरायसिसच्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी, समुपदेशन खूप महत्त्वाचे आहे. कारण हा अनुवांशिक आजार आहे. हा आजार तुमच्या सांध्यांवर परिणाम करतो आणि अशा रुग्णांना मानसिक आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात. त्यांना हृदयविकारांचा धोकाही जास्त असतो. अशा रुग्णांमध्ये रक्तदाब, शर्करा, कोलेस्टेरॉलची पातळी आणि कंबरेचा घेर वाढणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करताना सहव्याधी विचारात घेणे आवश्यक आहे. त्यानुसार उपचार पद्धती बदलते. रुग्णांनी नियमित व्यायाम करणे आणि चांगला आहार राखणे हे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहून आजार नियंत्रणात राहतो, असे रूबी हॉल क्लिनिकमधील त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. रश्मी अडेराव यांनी सांगितले.
सोरायसिस हा एक अनुवंशिक आजार आहे. पालकांना सोरायसिस असेल तर मुलांना तो होण्याची शक्यता जास्त असते. अनुवांशिकरित्या झालेला सोरायसिस हा तीव्र स्वरूपाचा असतो. त्यामुळे उपचार किंवा व्यवस्थापन त्याच्या गंभीरतेनुसार बदलते. सोरायसिस फक्त त्वचेपुरता मर्यादित नसतो तर तो सांध्यांसह आणि नखांनाही होऊ शकतो. – डॉ. रश्मी अडेराव, त्वचाविकारतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक
© The Indian Express (P) Ltd