पुणे : सोमवारी उगवत्या सूर्याच्या साक्षीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करुन ३२१ स्नातकांनी मातृभूमीच्या संरक्षणार्थ रुजू होण्याची शपथ घेतली. यावेळी प्रबोधिनीच्या प्रसिद्ध खेत्रपाल मैदानावर झालेल्या दिमाखदार दीक्षांत संचलनाचे प्रमुख निरीक्षक म्हणून हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी उपस्थिती लावली. यावेळी लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, एनडीएचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल अजय कोचर आणि उपप्रमुख तसेच मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल संजीव डोगरा उपस्थित होते.
यावेळी बोलताना “राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून ४० वर्षांपूर्वी मी माझे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आज दीक्षांत संचलनाचा प्रमुख निरीक्षक म्हणून उपस्थित राहताना त्यावेळच्या आठवणींनी मनात गर्दी केली आहे. तुम्ही निवडलेली वाट ही रुळलेली वाट नाही, त्यामुळे तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबरच युद्धाचे आयामही बदलत आहेत. या बदलत्या स्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा. हे क्षेत्र तुम्हाला देशसेवेची संधी आणि भरभरुन वैयक्तिक समाधान देईल,” अशा शब्दांत भारताचे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी राष्ट्रीय संरक्षणप्रबोधिनीच्या १४२ व्या तुकडीला शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा >> सिद्धू मुसेवाला यांच्या आईची संतप्त प्रतिक्रिया, मुलाच्या हत्येला पंजाब सरकार जबाबदार असल्याचा आरोप
एनडीएतील प्रशिक्षणादरम्यान सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्नातकांना एअर चीफ मार्शल चौधरी यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. अभिमन्यू सिंह राठोड याने राष्ट्रपती सुवर्ण पदकावर तर अरविंद चौहान याने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. नितीन शर्मा याला ब्राँझ पदकाने गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी माईक स्क्वॉड्रनला चीफ ऑफ स्टाफ बॅनर प्रदान करण्यात आला.
हेही वाचा >> Video : जगप्रसिद्ध मोनालिसा पेंटिंग धोक्यात! महिलेचा वेश धारण करत कलाकृतीला विद्रूप करण्याचा प्रयत्न
या दीक्षांत समारंभामध्ये बोलताना “राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षणातून तुम्ही मातृभूमीच्या संरक्षणासाठी सज्ज होत आहात. मात्र येथेच तुम्हाला आयुष्यभर जीवाला जीव देणारे मित्र मिळतील. यापुढे तुम्ही तुमच्या स्वत:च्या नावाने कमी आणि १४२ वी तुकडी म्हणून जास्त ओळखले जाल. या प्रवासात तुमच्या बरोबर असलेल्या शिक्षकांबरोबरच तुमच्या पालक आणि कुटुंबियांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो,” असे एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले.
दीक्षांत संचलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले, “युद्धसामग्री आणि तंत्रज्ञानासाठी भारत रशियावर मोठ्या प्रमाणावर अवलंबुन राहिला आहे. मात्र यापुढे आत्मनिर्भर धोरण अंगिकारल्यानंतर संरक्षण सामग्रीसाठी परावलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न तिन्ही दलांकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय कंपन्यांबरोबर काम केले जात आहे. तिन्ही सैन्यदलांनी या कामी पुढाकार घेतला असून कोणती सामग्री आयात करायची आणि कोणती कटाक्षाने स्वदेशी असेल याची यादीही तयार करण्यात आली आहे, असे एअर चीफ मार्शल चौधरी यांनी स्पष्ट केले.