पुणे : ड्युप्लेक्स किडनी हा मूत्रपिंडाचा दुर्मीळ जन्मजात विकार असलेल्या आठ महिन्यांच्या मुलीवर आधुनिक रोबोटिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. या विकारात रुग्णाच्या एका बाजूला मूत्रपिंडाचे दोन भाग आणि एकाऐवजी दोन मूत्रवाहिन्या असतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये मूत्रमार्ग संसर्गाचे प्रमाण वाढते. या उपचारामुळे या मुलीने या विकारातून मात केली आहे.

या मुलीचा जन्म ड्युप्लेक्स किडनी विकारासह झाला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला एकाऐवजी मूत्रपिंडांचे दोन भाग तयार झाले होते. प्रसूतीपूर्व चाचण्यांदरम्यान याचे निदान झाले नव्हते. जन्म झाल्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये उजव्या बाजूच्या मुत्रपिंडाच्या वरच्या भागात सूज दिसून आली होती. सूज असलेल्या भागाशी जोडलेल्या मूत्रवाहिनीद्वारे निचरा हा मुत्राशयाऐवजी मूत्रमार्गामध्ये होत होता. मूत्रपिंडाचा खालचा भाग हा सामान्य होता. या शारीरिक रचनेच्या दोषामुळे सहा महिन्यांच्या आतच मूत्रमार्गात संसर्ग होऊ लागल्याने लवकर शस्त्रक्रिया करणे आवश्यक बनले.

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये या मुलीला दाखल करण्यात आले. बालरोग शल्यचिकित्सक डॉ. गीता केकरे यांनी तिच्यावर कमीत कमी छेद असलेली रोबोटिक प्रक्रिया केली. मुलीच्या मूत्रपिंडाच्या भागाला सूज असली तरी त्याचे कार्य योग्य पद्धतीने सुरू होते. त्यामुळे तो भाग काढून टाकणे हा पर्याय नव्हता. त्याऐवजी युरेट्रो – युरेट्रोस्टोमी ही प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये मूत्रपिंडाच्या असामान्य असलेल्या वरच्या भागातील मूत्रवाहिन्यांना सामान्य असलेल्या खालच्या भागातील मूत्रवाहिन्यांशी जोडले गेले. यामुळे मूत्रमार्गाला योग्य निचरा करणे शक्य झाले. या बाळाला शस्त्रक्रियेनंतर ४८ तासांतच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

डुप्लेक्स किडनी ही स्थिती असणे नेहमीच चिंताजनक असेलच असे नाही. या प्रकरणात रुग्णाच्या उजव्या बाजूच्या वरच्या भागातून येत असलेल्या मूत्रवाहिनीतर्फे निचरा हा मूत्राशयामध्ये होत नव्हता. त्याऐवजी हा निचरा मूत्रमार्गामध्ये होत होता. यामुळे मुलीला वयाच्या सहा महिन्यांच्या आतमध्येच अनेक वेळा मूत्रमार्गातील संसर्ग होत होता. पुढील गुंतागुंत होऊ नये यासाठी कमीत कमी छेद करून रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. – डॉ. गीता केकरे, बालरोग शल्यचिकित्सक