पुणे : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल क्वांटम मिशन आणि नॅशनल मिशन ऑन इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टिम्समध्ये देशभरातील आठ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली आहे. त्यात आयआयटी मुंबईतील एक आणि पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) एक अशा राज्यातील दोन स्टार्टअप्सचा समावेश आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात ही निवड जाहीर करण्यात आली. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव प्रा. अभय करंदीकर, आयसर पुणेचे संचालक प्रा. सुनील भागवत या वेळी उपस्थित होते. नॅशनल क्वांटम मिशन आणि नॅशनल मिशन ऑन इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टिम्ससाठी निवडलेल्या स्टार्टअप्सना क्वांटम तंत्रज्ञान विकसनासाठी केंद्र सरकाकडून सहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी आयसर पुणेतील आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशन, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब यांच्यातर्फे प्रस्ताव मागवून निवड प्रक्रिया राबवण्यात आली.
हेही वाचा >>>Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद कोणाला मिळणार? चंद्रकांत पाटलांचं मोठं भाष्य; म्हणाले, “माझे वरिष्ठ…”
निवड झालेल्या स्टार्टअप्समध्ये बेंगळुरूस्थित क्यूनू लॅब्स ही नवउद्यमी क्वांटम सुरक्षित ‘हेटरोजिनियस नेटवर्क’ विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. क्यूपिएआय इंडिया ही नवउद्यमी सुपरकंडक्टिंग क्युबिट्स वापरून क्वांटम संगणक विकसित करण्याची योजना आखत आहे. आयआयटी मुंबईतील डिमिरा टेक्नॉलॉजीज ही नवउद्यमी क्वांटम संगणन आणि इतर क्षेत्रांसाठी स्वदेशी ‘क्रायोजेनिक रेडिओफ्रिक्वेन्सी केबल्स’ विकसित करणार आहे. आयआयटी दिल्ली येथील प्रेनिशक्यू या नवउद्यमीचा क्वांटम तंत्रज्ञानासाठी उच्च दर्जाची डायोड लेसर प्रणाली विकसित करण्यावर भर आहे. आयसर पुणे येथील क्यूप्रयोग ही नवउद्यमी क्वांटम तंत्रज्ञानासाठी टायटॅनियम सफायर लेसर आणि अति-सुस्पष्ट मोजमापांसाठी ऑप्टिकल फ्रिक्वेन्सी कोम्बची निर्मिती करत आहे. अहमदाबादस्थित प्रिस्टिन डायमंड्सतर्फे क्वाटंम सेन्सिंगसाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. दिल्ली येथील क्वानास्त्र ही नवउद्यमी क्रायोजेनिक प्रणाली आणि प्रगत सुपरकंडक्टिंग डिटेक्टर्स तयार करत असून, बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील क्वान२डी टेक्नॉलॉजीज या नवउद्यमीचे स्वदेशी आणि किफायतशीर सिंगल-फोटॉन डिटेक्टर्स विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.