पुणे : ‘राज्यात २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसवले, त्याच पद्धतीने शिवसेना (शिंदे) पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फसविले आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव टाळून केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनानंतर चव्हाण यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तरी अद्याप सरकार स्थापनेस विलंब का लागला जात आहे,’ असा प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण यांनी महायुती सरकारमध्ये आंतर्विरोध असल्याचे सांगितले.
हेही वाचा >>> मतदान यंत्रांच्या तपासणीस सरकार का घाबरते ?
‘यंदाची विधानसभा निवडणूक शिवसेना (शिंदे) पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. त्यामुळे त्यांना फसवले जाणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे फसवले गेले असल्याचे दिसून येत आहे. लोकशाही हा देशाच्या राज्यघटनेचा आत्मा असताना सरकारने या लोकशाहीचाच मुडदा पाडला आहे. निवडणुकीत पैशाचा वापर, सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही नष्ट केली आहे. सत्तेचा गैरवापर करून पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटण्यात आले. निवडणूक आयोगदेखील याबाबत शांत राहिला,’ असा आरोप चव्हाण यांनी केला.
हेही वाचा >>> वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ, गुन्हे शाखेकडून न्यायालायत अर्ज
‘माझ्या काळात मोदींची लाट’ ‘काँग्रेसला उतरती कळा लागली असून, माझ्या पक्षनेतृत्वाच्या काळात मी काँग्रेसला शंभरीपार जागा मिळवून दिल्या होत्या,’ अशी खोचक टीका भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी केली होती. त्या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘त्यांच्या काळात शंभरपेक्षा जास्त जागा मिळाल्या, हे ठाऊक नाही. पण, माझ्या काळात जागा कमी झाल्या. कारण त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या. त्या वेळीदेखील कमी जागा मिळाल्या. आता तर कुठला विरोध नसतानाही आम्हाला कमी जागा मिळाल्या आहेत.’