पुणे : गेल्या वर्षी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नरेंद्र मोदी स्टेडियम असे नामांतर करण्यात आल्याने पंतप्रधान टीकेचे धनी ठरले होत़े  राज्यात सत्तांतरानंतर महिन्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरही ही वेळ आली आह़े  पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर शिंदे यांच्या नावाने उद्यान उभे राहिले असून, त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार आह़े

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या मुख्य सभेने केलेल्या ठरावाला केराची टोपली दाखवित शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरातील या उद्यानाला एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे. त्यामुळे उद्यानाचे उद्घाटन वादग्रस्त ठरण्याची शक्यता असून शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. 

महापालिकेच्या मुख्य सभेने २४ जुलै २००० मध्ये उद्यानांना देण्यात येणाऱ्या नावांबाबत ठराव केला आहे. या ठरावानुसार महापालिकेच्या उद्यानांना नाव देताना वैयक्तिक नावे देता येत नाहीत. राष्ट्रीय नेते, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञांची नावे उद्यानांना देण्यास परवानगी आहे. मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांकडून त्यांच्या कुटुंबीयांची नावे उद्यानांना आणि अन्य वास्तूंना दिली जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी गुलटेकडी भागातील सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला भाजपच्या नगरसेवकाने त्यांच्या वडिलांचे नाव दिले होते. त्याविरोधात सॅलिसबरी पार्क कृती समितीने आक्षेप घेत त्याविरोधात लढा सुरू केला आहे. ही घटना ताजी असतानाच शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरप्रमुख म्हणून नियुक्त केलेले माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरात उद्यान विकसित केले आहे. या उद्यानाला त्यांनी एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे. महापालिकेचा ठरावाला केराची टोपली दाखवत नाव देण्यात आले आहे. आता या उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच होणार असल्याने त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, उद्यान विकसित करण्यात आलेली जागा महापालिकेची आहे. मात्र एका खासगी विकासकाकडून ते विकसित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या हे उद्घाटन वादात सापडण्याची शक्यता आहे.

शहरातील ८२ उद्यानांना वैयक्तिक नावे

शहरातील ८२ उद्यानांना नगरसेवकांनी त्यांच्या कुटुंबीयांची नावे दिली आहेत. माहिती अधिकाराच्या तपशिलातून ही बाब उघडकीस आली आहे. ही बाब पुढे आल्यानंतर महापालिका प्रशासनाने विधि विभागाकडून अभिप्राय मागविला आहे. त्यामध्ये नावे बदलण्याचे सुचविण्यात आले आहे.

उद्यानांना कुटुंबीयांची नावे देण्याची पद्धत चुकीची आहे. महापालिकेच्या ठरावाविरोधात नावे दिली जात आहेत. सॅलिसबरी पार्क उद्यानालाही असेच नाव देण्यात आले होते. त्याविरोधात नागरिकांचा लढा सुरू आहे. हडपसर येथील उद्यानालाही एकनाथ शिंदे यांचे नाव देण्याला विरोध आहे. – विनिता देशमुख, सामाजिक कार्यकर्त्यां

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde udyan inaugurated by the chief minister today zws