पुणे : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी रेल्वे, विमानांच्या तिकिटांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील ७२ वर्षांचे सूर्यकांत साखरे आणि रजनी साखरे या दाम्पत्याने थेट दुचाकीवरून प्रयागराज गाठले. तब्बल ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत साखरे दाम्पत्याने विविध धार्मिक स्थळांना भेट दिली.

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून भाविक येत आहेत. त्यामुळे प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी रेल्वे, विमानाच्या तिकिटांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेकजण खासगी बस घेऊन प्रयागराजला जात आहेत. मात्र, शनिवार पेठेत वास्तव्याला असलेल्या साखरे दाम्पत्याने रेल्वे, विमानाच्या तिकिटांसाठी प्रतीक्षा करण्यापेक्षा दुचाकीला पसंती दिली. सलग २४ दिवसांत या दाम्पत्याने पुणे ते प्रयागराज आणि प्रयागराज ते पुणे असा प्रवास केला. या प्रवासात त्यांनी शनिशिंगणापूर, शिर्डी, उज्जैन, चित्रकूट, काशी, अयोध्या अशा धार्मिक स्थळांना भेट दिली. साखरे दाम्पत्याने आत्मविश्वास आणि जिद्दीने केलेल्या या प्रवासाचा गौरव म्हणून साखरे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि अनिरुद्ध येवले यांच्यातर्फे विशेष सत्कार कार्यक्रम झाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आमदार हेमंत रासने, पराग ठाकूर, श्रीधर साखरे, मनीषा झेंडे, प्राची एक्के या वेळी उपस्थित होते.

सूर्यकांत साखरे म्हणाले, की काशीयात्रा करण्याचे तीन-चार वर्षांपासून मनात होते. मात्र, यंदा प्रयागराजला महाकुंभमेळा होत आहे. त्यामुळे पत्नीसह कुंभमेळ्याला दुचाकीवरून जायचे ठरवले. हा प्रवास मोठा असल्याने सराव म्हणून डिसेंबरमध्ये दहा दिवसांचा एक प्रवास केला. त्यानंतर महाकुंभमेळ्याचा प्रवास केला. सुरुवातीला पुणे ते शिर्डी असा प्रवास करून साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रयागराजला जाऊन महाकुंभमेळ्यात सहभागी झालो. तो अनुभव अत्यंत विलक्षण होता.

रस्ते माहीत नव्हते, मोबाइलवर मॅप वापरण्याची माहिती नव्हती. त्यामुळे रस्ते विचारत प्रवास केला. प्रयागराजमध्ये प्रशासनाने सहकार्य केल्यामुळे थेट संगमापर्यंत दुचाकी नेता आली. गाडी पंक्चर होण्यासारख्या काही अडचणी आल्या. पण, त्या लगेचच सुटल्या. या प्रवासात अनेकांनी मदतही केली. सकाळी लवकर प्रवास सुरू करून सायंकाळी पाच-साडेपाचला थांबायचो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आराम करायचो. त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी आल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader