पुणे : दूरचित्रवाणी संच दुरुस्त करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी वानवडी भागातील एका ज्येष्ठ महिलेची १४ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोालिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ६५ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वानवडी भागात राहायला आहेत. त्यांच्या घरातील दूरचित्रवाणी संचात बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांनी दूरचित्रवाणी संच निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रातील क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी ग्राहक सेवा केंद्रातील संपर्क क्रमांकात फेरफार करुन त्यांचा मोबाइल क्रमांक तेथे समाविष्ट केला होता. महिलेने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. दूरचित्रवाणी संचात बिघाड झाल्याची तक्रार त्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली.
चोरट्यांनी लिंकमध्ये त्यांना वैयक्तिक माहिती, तसेच बँक खात्याची माहिती पाठविण्यास सांगितले. बँक खात्यातील माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या खात्यातून १४ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने स्वत:च्या खात्यात हस्तांतरित केले. खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोविंद जाधव तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने वाघोली परिसरातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी १२ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वाघाेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण वाघोली भागात राहायला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सायबर चोरट्याने तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. तरुणाने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. तरुणाने रक्कम गुंतविल्यानंतर सुरुवातीला परतावा देण्यात आला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड तपास करत आहेत.
चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन
शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष, ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी, तसेच तपास यंत्रणेकडून कारवाईची भीती दाखवून सामान्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांच्या बतावणी करुन नागरिकांची कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.