बारामतीमध्ये होणारी लोकसभेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे आणि या लढतीत जनशक्तीचाच विजय होईल, असा दावा बारामती मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी बुधवारी केला. महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाला दिलेली उमेदवारी हे कोणत्याही प्रकारचे फिक्सिंग नाही, असेही ते म्हणाले.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या महायुतीचे उमेदवार असलेले जानकर यांची पत्रकार परिषद बुधवारी येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. आमदार विजय शिवतरे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ आणि अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे यांना बारामतीमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तर जानकर माढा मतदारसंघाऐवजी आता बारामतीमध्ये निवडणूक लढवत आहेत. याबाबत ते म्हणाले, की माढा मतदारसंघावर माझा दावा होता. परंतु महायुतीच्या नेत्यांनी मला बारामती मतदारसंघ दिला आहे. महायुतीच्या पाठिंब्यावर मी निश्चितपणे बारामतीमधून विजयी होईन.
फिक्सिंग ही जनतेची भावना;
बारामती मतदारसंघात मी गेली साडेचार वर्षे तयारी करत होतो. मात्र, महायुतीच्या उमेदवारीत मला डावलले गेले. त्यामुळे बारामती मतदार संघात फिक्सिंग झाले ही जनतेची भावना आहे. मी फक्त ती भावना बोलून दाखवली. उमेदवारी देताना नेत्यांनी फिक्सिंग केले असे मी म्हणालो नाही, असा दावा आमदार विजय शिवतरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. येणाऱ्या निवडणुकीत मतदार जानकर आणि शिवतरे असा भेद करणार नाहीत आम्ही निश्चितच निवडून येऊ, असाही दावा त्यांनी केला.
बारामतीमधून विजयाचा महायुतीचे जानकर यांचा दावा
महायुतीच्या उमेदवारीत मला डावलले गेले. त्यामुळे बारामती मतदार संघात फिक्सिंग झाले ही जनतेची भावना आहे. मी फक्त ती भावना बोलून दाखवली.
First published on: 06-03-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election baramati mahadev jankar vijay shivtare