पुणे शहर सुरक्षित आहे, हे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले विधान ही पुणेकरांची चेष्टा आहे. पुण्यातील अतिरेकी आणि नक्षलवादी कारवाया तसेच पुण्यातील वाढती गुन्हेगारी यांचा विसर गृहमंत्र्यांना पडला आहे का, असा प्रश्न उपस्थित करत गृहमंत्र्यांनी पुणेकरांचा अपमान केला आहे, अशी टीका आमदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत शिंदे यांनी पुणे शहर सुरक्षित असल्याचा दावा केला होता. या दाव्यावर आमदार बापट यांनी शुक्रवारी जोरदार टीका केली. पुणे सुरक्षित असल्याचा दावा करून गृहमंत्र्यांनी पुणेकरांना मनस्ताप दिला आहे. त्यामुळे त्या विधानाचा मी निषेध करतो असे सांगून बापट म्हणाले, की गृहमंत्र्यांनी जे खोटे विधान केले आहे त्याचा वचपा पुणेकर येणाऱ्या निवडणुकीत लोकशाही पद्धतीने काढतील. देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. देशात दहशतवादी हल्लेही होत आहेत. त्यात निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. देशाच्या सीमा आणि देश जसा असुरक्षित आहे, त्याच पद्धतीने पुणे शहरही असुरक्षितच आहे. पुण्यात दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरू आहेत. गुंडगिरी, खून, साखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि गृहमंत्री मात्र शहर सुरक्षित असल्याचे सांगत आहेत. पुणे असुरक्षित असताना शहरात एकही सीसी टीव्ही कॅमेरा बसलेला नाही आणि त्यासाठीची यंत्रणाही शासनाला राबवता आलेली नाही.
काँग्रेसने खुलासा करावा
लोकसभा निवडणुकीत जास्तीतजास्त जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस नक्षलवाद्यांची मदत घेत आहे आणि तसे संभाषण काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग व नक्षलवाद्यांमध्ये झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. ‘लोकसत्ता’ने हे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध केले आहे. या संभाषणाच्या ध्वनिफिती देखील मिळाल्या असून या संदर्भातील आणखी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून उघड होण्यापूर्वीच काँग्रेसने आता यासंबंधीचा खुलासा करावा, अशीही मागणी आमदार बापट यांनी पत्रकार परिषदेत केली.
पूरग्रस्तांचा प्रश्न पतंगरावांमुळेच प्रलंबित
पुणे शहरातील पूरग्रस्त वसाहतींमधील वाढीव बांधकामे नियमित करण्याबाबत संबंधितांची बैठक बोलावून निर्णय केला जाईल, असे आश्वासन पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिले होते. प्रत्यक्षात त्यांनी अशी एकही बैठक घेतलेली नाही. त्यामुळे शहराच्या विकासाची भाषा बोलताना डॉ. पतंगराव कदम यांनी पूरग्रस्तांसाठी काय केले ते जाहीर करावे. त्यांच्यामुळेच पूरग्रस्त वसाहतींमधील वाढीव बांधकामांचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे, अशी टीका पत्रकार परिषदेत बोलताना उज्ज्वल केसकर यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा