राजकीय सोय आणि निवडून येण्याची खात्री वाटत असल्याने महायुतीच्या वाटेवर असलेले काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सध्या वेगळ्याच चिंतेत आहेत. शिवसेना-भाजप व मित्र पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली ओढाताण पाहून महायुती तुटलीच तर, ‘आगीतून फुफाटय़ात’ पडू, अशी धास्ती त्यांना आहे.
चिंचवडसाठी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे, अपक्ष नगरसेवक मोरेश्वर भोंडवे तर, भोसरीसाठी स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप व अण्णा बनसोडे यांच्या ‘तळ्यात-मळ्यात’ अशा भूमिकेमुळे संशयाचे धुके त्यांच्याभोवती आहे. लोकसभेतील मोदी लाट विधानसभेतही राहील, असा विश्वास या मंडळींना आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीची उमेदवारी न मागता महायुतीच्या प्रतीक्षा रांगेत उभे राहण्यात त्यांना धन्यता वाटते आहे. प्रत्यक्षात, महायुतीतील जागावाटपाचा तणाव दिवसेंदिवस वाढत असून महायुती तुटण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असल्याने या मंडळींना धास्ती वाटते. ‘तेलही गेले तूपही गेले’ अशी अवस्था होऊ नये म्हणून त्यांचा सावध पवित्रा दिसून येतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा