पुणे : राज्यातील अकृषि विद्यापीठे आणि सलंग्नित महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश उच्च शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना दिले आहेत.
उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यानुसार आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्यातील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी समाईक परिनियम अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही, त्यांच्याशी संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कामात कोणत्याही प्रकारे भाग घेता येणार नाही अथवा सहाय्य करता येणार नाही, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
हेही वाचा – पुणे : दिवाळी संपताच चोरट्यांचा धुमाकूळ, लुटमारीच्या घटना वाढीस
कोणताही कर्मचारी विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत प्रचार करु शकणार नाही, हस्तक्षेप करु शकणार नाही, त्यासंबंधी आपले वजन खर्च करु शकणार नाही किंवा त्यात भाग घेऊ शकणार नाही. त्यामुळे विद्यापीठ किंवा संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक कामात किंवा प्रचार कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा – पुणे : शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची २० लाखांची फसवणूक
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न
निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यात महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांना मतदान करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
© The Indian Express (P) Ltd