मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात मतदानाच्या दिवशी (१७ एप्रिल) तापमान सरासरीइतके किंवा त्यापेक्षा १-२ अंशांनी जास्त राहण्याची शक्यता असून, या पट्टय़ात कमाल तापमान ३८ ते ४२ अंशांच्या दरम्यान राहील, असा अंदाज हगवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. या उकाडय़ाचा मतदानावर किती परिणाम होणार, याबाबत उत्सुकता आहे.
महाराष्ट्रामध्ये विदर्भात गेल्या गुरुवारी मतदान झाले. त्यानंतर येत्या गुरुवारी (१७ एप्रिल) मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात मतदान होत आहे. एप्रिलच्या मध्यानंतर महाराष्ट्रात उकाडा टिपेवर असतो. त्यामुळे मतदानाच्या दिवशी किती उकाडा असणार आणि त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर किती परिणाम होणार, याबाबत उत्सुकता आहे.
हवामान विभागातर्फे पुढील चार दिवसांच्या हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यानुसार, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात १७ तारखेपर्यंत हवामान कसे असेल, तापमान किती असेल, हे हवामान विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या पट्टय़ात मुख्यत: मराठवाडय़ात आकाश निरभ्र असेल. पुण्यासह काही भागात किंचित ढगाळ हवामान अनुभवायला मिळेल. या पट्टय़ात १७ तारखेला कमाल तापमान ३८ ते ४२ अंशांच्या दरम्यान राहील, असा अंदाज वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, १७ तारखेपर्यंत आकाश मुख्यत: स्वच्छ राहील. त्यानंतर ढगाळ वातावरणात वाढ होईल. पुढे वादळी पावसाचीसुद्धा शक्यता असेल. मात्र, १७ तारखेपर्यंत हवामानात फार बदल होणार नाही.
हवामानाच्या अंदाजानुसार १६-१७ तारखेला असे कमाल तापमान असेल :

  • पुणे              ३८-३९ अंश
  • नाशिक        ३७-३८ अंश
  • सोलापूर        ४१-४२ अंश
  • औरंगाबाद     ३७-३८ अंश
  • परभणी         ४१-४२ अंश

Story img Loader