पिंपरी : राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच सर्व कामकाज पहावे लागत आहे.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार २२ ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. सर्व विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या यापूर्वीच नियुक्त्या झाल्या आहेत.
हेही वाचा >>> BJP Candidate For Chinchwad Assembly Constituency : ‘चिंचवड’वरून भाजपमध्ये गटबाजी
चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झालेले महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी दोन महिन्यांच्या वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी अद्याप नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. राज्यात सर्वांत मोठा मतदार संघ चिंचवड आहे. सहा लाख ५५ हजार ३७० मतदार तर ५६४ मतदान केंद्र आहेत. असे असताना आचारसंहिता लागून दोन दिवस झाल्यानंतरही चिंचवडसाठी अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही.
हेही वाचा >>> ‘झोपुयो’चे तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पत्नीविरुद्ध गुन्हा; बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ‘एसीबी’कडून कारवाई
भोसरीत संवेदनशील मतदान केंद्र नाही
भोसरी विधानसभा मतदारसंघात सहा लाख ८४८ मतदार आहेत. त्यात पुरुष तीन लाख २४ हजार ६९९, महिला दोन लाख ७६ हजार ५२, इतर ९७ मतदार आहेत. १२ हजार ४६३ नवमतदार आहेत. तर, मतदान केंद्र ४९२ असणार आहेत. एका मतदान केंद्रावर १२२१ मतदार असतील. एकही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रेवन्नाथ लबडे यांनी सांगितले. निवडणूक कार्यालय महापालिकेच्या चिखली, पूर्णानगर येथील बहुउद्देशीय सभागृहात आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मतदान केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दिव्यांगासाठी व्हिलचेअर, मोटारीची सुविधा दिली जाणार आहे. महिला, युवक संचलित मतदान केंद्रे असणार आहेत. विविध नऊ पथकांची नेमणूक केली आहे. मतदार संघातील फलक काढण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.