‘कुणीही काहीही मुद्दे उपस्थित केले तरी माझा प्रचार हा विकासाच्या मुद्दय़ावरच राहील. निवडून आल्यानंतर पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचे मंजूर झालेले टप्पेच नाही, तर तिसरा टप्पाही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार,’ असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांनी गुरूवारी सांगितले.
कदम यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली. या निमित्ताने त्यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. या वेळी डॉ. सतिश देसाई उपस्थित होते. उमेदवारीबद्दल झालेल्या राजकीय चर्चा, उमेदवार म्हणून असलेली आव्हाने, पुण्याचा विकास अशा विविध मुद्दय़ांवर डॉ. कदम यांनी या वेळी चर्चा केली.
डॉ. कदम म्हणाले, ‘‘पुण्याच्या विकासाबाबत माझ्याकडे व्हिजन आहे. याच मुद्दय़ावर मतदार माझ्यावर विश्वास ठेवतील असे मला वाटते. निवडून आल्यानंतर पुण्यातील वाहतूक व्यवस्था, औद्योगिक विकास ज्यामुळे तरूणांना नोकरीच्या संधी वाढतील आणि सुरक्षा या गोष्टींसाठी प्राधान्याने काम करेन. पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे तीनही टप्पे पूर्ण करण्याला प्राधान्य राहील.’’
‘मोदींची लाट’ ही माध्यमांनी निर्माण केलेली हवा असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘प्रथमदर्शनी लोकांचे मत हे शासनाच्या विरोधी दिसत आहे, हे खरे आहे. मात्र, ते काँग्रेस विरोधी नाही. आपचा धोका वाटत नाही. ‘आप’ने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवणे व्यावहारिकदृष्टय़ा शक्य नाही. भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधकांनी मोठा केला आहे. मात्र, भ्रष्टाचार हा काही फक्त केंद्रीय पातळीवरील मुद्दा नाही. भ्रष्टाचार हा स्थानिक पातळीवर अधिक आहे.’’
उमेदवारी मिळाल्यानंतर झालेल्या राजकीय चर्चाबाबत डॉ. कदम यांनी सांगितले, ‘‘कलमाडी पक्षाचे नेतृत्व करत होते. त्यामुळे कार्यकत्यांची त्यांच्याशी जवळीक होती. मात्र, आताही सर्व कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत. प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे ओढाताण होतीच. त्यामुळे काही कुरबुरी या सगळ्याच पक्षांमध्ये झाल्या.’’
‘मी पुण्याबाहेरचा कसा?’
‘‘माझा जन्म पुण्यातील आहे. संपूर्ण शिक्षण पुण्यात झाले. आमचे कुटुंब गेली चाळीस वर्षे पुण्यात राहात आहे. असे असताना मी बाहेरचा आहे, असा प्रचार कुणी आणि कशासाठी केला? मला उमेदवारी मिळू नये यासाठी चाललेल्या प्रयत्नातून हा मुद्दा उभा करण्यात आला होता. माझ्यासाठी हा विषय नाही,’’ असे कदम यांनी स्पष्ट केले.
निवडून आल्यास मेट्रो प्रकल्प पूर्ण करणार – विश्वजित कदम
‘कुणीही काहीही मुद्दे उपस्थित केले तरी माझा प्रचार हा विकासाच्या मुद्दय़ावरच राहील. निवडून आल्यानंतर पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचे मंजूर झालेले टप्पेच नाही, तर तिसरा टप्पाही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार.’
First published on: 04-04-2014 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election congress metro vishwajeet kadam