पुणे शहर आणि जिल्ह्य़ात आतापर्यंत एकूण ३७ आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाच्या सुमारे दीडशे तक्रारी आल्या असून त्यापैकी १२२ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. त्यानुसार काही प्रकरणात गुन्हे दाखल केले असून काहींमध्ये दंड आणि कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत एकूण दोन लाख लिटर मद्य जप्त केले आहे.
पुणे जिल्ह्य़ात पुणे, शिरुर, मावळ आणि बारामती हे चार मतदार संघ आहेत. मतदानाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून पुणे जिल्ह्य़ात विविध ठिकाणी तब्बल ३७ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ३१ गुन्हे असून जिल्ह्य़ात सात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाहने वापरणे, परवानगी न घेता रॅली काढणे, मारहाण, आयटी अॅक्ट अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांचा समावेश आहे.  
निवडणुकीच्या गुन्ह्य़ांसंदर्भात उप जिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले की, आचारसंहिता भंग केल्याची एकूण १४६ प्रकरणे आली आहेत. त्या सर्व तक्रारींची चौकशी केल्यानंतर १२२ तक्रारींमध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याचे आढळून आले. त्यानुसार काही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले, तर काहींमध्ये दंड अथवा कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात बेकायदेशीरपणे बाळगलेली एकूण ५८ शस्त्रे जप्त आणि ५९ काडतुसे जप्त केली आहेत. त्याचबरोबर एक लाख ९५ हजार १०८९ लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. मद्य, शस्त्रास्त्र आणि काडतुसे यांची एकूण रक्कम ही ६४ लाख २५ हजार रुपये आहे. तसेच, पुणे जिल्ह्य़ात आतापर्यंत सहा हजार ८३२ जणांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तीन हजार २८७ जणांविरुद्ध वॉरन्ट बजाविण्यात आले आहे. तसेच ३६८ जणांना अजामीनपात्र वॉरन्ट बजावले असून २७१ जणांस वॉरंट बजावण्याचे काम चालू आहे.
पुणे जिल्ह्य़ात कोटींची रक्कम जप्त
पुणे शहरात तीन ठिकाणी पैसे पकडले आहेत. या ठिकाणांची एकूण रक्कम साठ लाख रुपये आहे. तर, हिंजवडी येथील जबरी चोरीच्या गुन्ह्य़ात ७१ लाख रुपये मिळाले आहेत. त्या रकमेचा सुद्धा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. पुणे ग्रामीणमध्ये दोन ठिकाणी पैसे पकडले असून त्यामध्ये साधारण दहा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी लोणीकाळभोर आणि जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा