भाजप नेत्यांपुढे पेच; उद्या दुपारी चित्र स्पष्ट होणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाची शर्यत निर्णायक वळणावर आली असताना, या पदासाठी खरे ओबीसी आणि खोटे ओबीसी असा संघर्ष नव्याने समोर आला आहे. कोणत्याही परिस्थितीत महापौरपद माळी समाजाला मिळायला हवे, यासाठी समाजातील नेते व कार्यकर्ते एकवटले आहेत. ‘अभी नही, तो कभी नही’ असा नारा त्यांनी या संदर्भात दिला आहे. अशा परिस्थितीत, भाजप नेत्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.

पिंपरीच्या महापौरपदासाठी ४ ऑगस्टला निवडणूक होणार असून मंगळवारी (३१ जुलै) दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. काही तासातच महापौरपदाचे चित्र स्पष्ट होणार असल्याने महापौरपदाची शर्यत अधिक वेगवान झाली आहे. महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. राजीनामा दिलेले महापौर नितीन काळजे कुणबी होते. आगामी महापौरपदासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्यांमध्येही कुणबी गटातील नगरसेवक आहेत. पिंपरी पालिकेतील ओबीसींच्या जागेवर कुणबी दाखल्यांचा आधार घेत अनेक नगरसेवक निवडून आले आहेत. ते खरे ओबीसी नाहीत, असा आक्षेप ओबीसी संघर्ष समितीने वेळोवेळी घेतला आहे.

भाजपने कुणबी दाखल्यावर निवडून आलेल्या नगरसेवकास पहिले महापौरपद दिले. सव्वा वर्षांची मुदत संपली म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याने नव्या महापौरांची निवड होणार आहे.

यंदाचे महापौरपद पुन्हा कुणबी समाजाला देऊ नये, या मागणीसाठी माळी समाजाच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यापूर्वी, माळी समाजाच्या अनिता फरांदे, अपर्णा डोके, डॉ. वैशाली घोडेकर यांनी महापौरपद भूषवले आहे. माळी समाजाचा पुरुष महापौर झालेला नाही, ती संधी याच वर्षी आहे, असा मुद्दा पुढे करत समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पक्षाच्या अनेक नेत्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. समाजाला डावलण्यात आल्यास भाजपला धडा शिकवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर, भाजप नेत्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. मंगळवार दुपापर्यंत आणखी नाटय़मय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

Story img Loader