महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रक्रियेत सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन तळागाळात शासनाच्या विविध योजना पोचविणारे काँग्रेसचेच सरकार पुन्हा सत्तेत येणार असून, राज्यात पुन्हा काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार आहे. राज्यात विकासाच्या बाबतीत इंदापूर तालुका पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी विक्रमी मताने विजयी करा, असे आवाहन माजी सहकारमंत्री आणि इंदापूरचे काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केले.
त्यांच्या इंदापूर तालुक्यात गलांडवाडी, वरकुट, लोणी देवकर, डाळज सणसर या भागासाठी सभा झाली. त्यात ते बोलत होते. याशिवाय इंदापूर तालुक्यात इतरही अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या.
ते म्हणाले की, एकेकाळी दुष्काळाच्या खाईत असलेला इंदापूर तालुका सिंचन क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे आता शेतीउत्पन्नाच्या बाबतीमध्ये अग्रेसर ठरला आहे. इंदापूर तालुक्याचे वार्षकि उत्पन्न तीन हजार कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. आगामी काळात भविष्याचा वेध घेऊन इंदापूर तालुक्याचा सर्वागीण विकास करण्याचा व तालुक्यात समृध्दी आणण्याचा प्रयत्न मी गेली वीस वष्रे करीत आहे. त्याचे दृष्य परिणाम दिसत आहेत.
इंदापूर तालुका राज्याचे शक्तिस्थळ होत असल्यामुळे तालुक्यावर राजकीय हल्ले सुरू झाले आहेत. विरोधकांनी खालची पातळी गाठली आहे. इंदापूर तालुका वेगळया विचाराचा आणि संस्कृतीचा आहे. काही घातकी लोकांनी वीस वर्ष छुपा संघर्ष केला. त्याला इंदापूर तालुक्यातील जनेतेने सडेतोड उत्तर दिले. आता तर ते आमने सामने आले आहेत, पण जनता माझ्या पाठीशी आहेतोपर्यंत कोणीही माझा पराभव करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा