राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव ‘नामधारी’ अध्यक्ष आहेत. ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून तिकडे थारा मिळाला न मिळाल्याने ते राष्ट्रवादीत आले. दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी आम्हाला अक्कल व निष्ठा शिकवू नये, अशी टीका आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या काळेवाडीतील सभेत जाधव यांनी लक्ष्मण जगताप यांचा खरपूस समाचार घेतला. त्यास जगतापांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवण्यासाठी दीड वर्षे मुख्यमंत्री कार्यालयाचे उंबरे झिजवत होतो. मात्र, शेवटपर्यंत त्यांनी झुलवत ठेवले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांनाही यश आले नाही. हा प्रश्न न सुटल्यास उमेदवारी घेणार नसल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले. त्याची कल्पना शरद पवार व अजितदादांनाही दिली होती. असे असतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पद्धतशीरपणे नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. भास्कर जाधव यांना सर्व माहिती आहे. ते पूर्वीचे शिवसैनिक आहेत, त्यांना दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही. त्यांनी आम्हाला अक्कल व निष्ठा शिकवू नये, असे जगताप म्हणाले.

Story img Loader