पुणे : साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे होणाऱ्या आगामी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षाची निवड रविवारी (२५ जून) पुण्यामध्ये होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाच्या तारखांसह या संमेलनातील कार्यक्रमांच्या रुपरेषावर चर्चा होणार आहे.
वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जेमतेम पाच महिने झाले आहेत. त्यानंतर साहित्य महामंडळाने आगामी संमेलनाची तयारी सुरू केली आहे. पुण्यामध्येच झालेल्या बैठकीमध्ये आगामी ९७ वे साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आता पुण्यामध्येच रविवारी होत असलेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये संमेलनाच्या तारखा, कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्याबरोबरच या संमेलनाचे नियोजित अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. अमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ ही या संमेलनाची आयोजक संस्था आहे.
हेही वाचा >>>धक्कादायक..! धावत्या रेल्वेतून उडी मारून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या
साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शन समितीच्या शनिवारी (२४ जून) होत असलेल्या बैठकीमध्ये अमळनेर संमेलनाच्या तारखा आणि संमेलनातील कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. तर, रविवारी (२५ जून) होणाऱ्या बैठकीमध्ये मार्गदर्शन समितीने ठरवलेल्या तारखा आणि कार्यक्रमाला मंजुरी घेण्यात येणार आहे. त्याबरोबरच साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांनी शिफारस केलेल्या नावांवर चर्चा होऊन त्यापैकी एका नावावर संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>पुणे : सिंहगड रस्ता भागातील विक्रेत्यांकडून खंडणी घेणारे चार गुंड तडीपार; धमकाणारे गुंड तडीपार
ही नावे चर्चेमध्ये
अमळनेकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी साने गुरुजी यांचा सहवास लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, कथाकार डॉ. रवींद्र शोभणे आणि ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांची नावे विविध माध्यमांद्वारे चर्चेत आहेत. मात्र, संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान कोणाला मिळेल यासाठी साहित्य रसिकांना रविवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.