पुणे : राज्य कबड्डी संघटनेची बहुचर्चित चौवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याचेच स्पष्ट संकेत उमेदवारांच्या अर्ज पडताळणीनंतर मिळत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या अर्ज पडताळणीनंतर सरकार्यवाह आणि कार्याध्यक्ष या दोन पदांसाठीदेखील एकाच उमेदवाराचा अर्ज वैध ठरला आहे. अध्यक्ष आणि खजिनदारपदासाठी एकच अर्ज आल्याने त्याबाबत आक्षेप असण्याचे कारणच नव्हते. आता उपाध्यक्ष, सहकार्यवाह आणि कार्यकारी सदस्यपदासाठीच निवडणूक होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य कबड्डी संघटनेच्या घटनेनुसार एक उमेदवार एकाच पदासाठी अर्ज करू शकतो. मात्र, रवींद्र देसाई यांनी सरकार्यवाह आणि सहकार्यवाह अशा दोन्ही पदांसाठी अर्ज केला होता. अमरसिंह पंडित आणि दिनकर पाटील यांनी उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अशा दोन पदांसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा रवींद्र देसाई यांनी सहकार्यवाह आणि अमरसिंह, दिनकर पाटील यांनी उपाध्यक्षपदाला पसंती दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षे कबड्डी संघटनेत प्रामाणिकपणे आणि सचोटीने धडपड करणाऱ्या मंगल पांडे यांचा मार्ग मोकळा झाला. मंगल पांडे यापूर्वीदेखील या पदासाठी उत्सुक होते. पण, तेव्हाच्या हंगामी जबाबदारीसाठी बाबुराव चांदेरे यांना पसंती मिळाली. या वेळी चांदेरे यांचेच पारडे जड राहणार अशी चर्चा असतानाच त्यांनी केवळ उपाध्यक्षपदाला अर्ज सादर करून आश्चर्याचा धक्का दिला असे मानले जात आहे.

हेही वाचा : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे; किनारपट्टी, घाटमाथ्यावर मुसळधार

अमरसिंह पंडित आणि दिनकर पाटील यांनी उपाध्यक्षपदातच स्वारस्य दाखवले. त्यामुळे कार्याध्यक्षपदासाठी अमोल कीर्तिकरांचा मार्ग मोकळा झाला. अर्थात, दिनकर पाटील यांनी संघटनेत प्रदीर्घ कालावधीसाठी काम केले आहे. त्यामुळे आता ते किती दिवस काम करणार अशी चर्चा खासगीत सुरू आहे. सध्या उपाध्यक्षपदाच्या पुरुष उमेदवारांच्या ५ जागांसाठी ११, तर महिलांच्या २ जागांसाठी ३, सहकार्यवाहपदाच्या पुरुष उमेदवारांच्या ५ जागांसाठी ८ आणि महिलांच्या दोन जागांसाठी ३ उमेदवार आणि कार्यकारिणी सदस्यांच्या पुरुषांच्या ४ जागांसाठी ५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महिलांच्या एका जागेसाठी माधवी काळे या एकट्याच आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी १६ जुलै ही अंतिम मुदत आहे. अजून चार दिवस बाकी असल्यामुळे ही निवडदेखील बिनविरोध होईल, असा मतप्रवाह राज्याच्या कबड्डी वर्तुळात चर्चेत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election of maharashtra state kabaddi association is likely to be unopposed pune print news dpb 28 css
Show comments