पुणे : संस्थेच्या घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविली गेली नसल्याचा आक्षेप घेतल्याने अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. डाॅ. संगीता बर्वे यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी ज. गं. फगरे यांनी राजन लाखे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, या निवडीलाही आक्षेप घेत धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागण्यात येणार असल्याचे काही सभासदांनी जाहीर केले.
अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने निवडणूकीचा कार्यक्रम मागील आठवड्यात जाहीर करण्यात आला होता. ज. ग. फगरे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. मात्र, कार्यकारिणीसाठी इच्छुकांची नावे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याऐवजी कोषाध्यक्षाकडे व्हॉटस्अपवर तसेच पोस्टाने मागविण्यात आली. मतदार यादीसंदर्भात हरकती सूचना मागवून दुरूस्त यादी जाहीर करणे यासह घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही, असा आक्षेप घेत संस्थेच्या आजीव सभासदांनी सभेत मुद्दे उपस्थित केले. संस्थेच्या व्हाट्सअप समुहावर जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीतून अनेक बालसाहित्यकारांची नावे वगळण्यात आली, असे आक्षेप नोंदवूनही त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, या मुद्द्यांवरून सभेमध्ये गदारोळ झाला. संस्थेच्या उदगीर, नांदेड, जालना, परभणी, औरंगाबाद आणि सातारा अशा सहा शाखा आहेत. मात्र या सहा शाखांना मतदानाचा अधिकार का नाकारला?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या गदारोळातच बर्वे यांनी अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फगरे यांनी संस्थेच्या अध्यक्षपदासाठी लाखे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबवून कार्यकारिणीची निवड करावी या मागणीवर ठाम असलेल्या सभासदांनी लाखे यांच्या निवडीबाबत आक्षेप नोंदविला.मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेची सर्वसाधारण सभेचे राजकीय आखाड्यामध्ये रूपांतर होऊ नये या उद्देशातून मी अध्यक्षपापासून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.
वकिलांशी विचारविनिमय करून फगरे यांनी जाहीर केल्यानुसार राजन लाखे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. – डाॅ. संगीता बर्वे, मावळत्या अध्यक्षा, अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना डावलून कार्यकारिणीसाठी नावे कोषाध्यक्षांकडे मागविण्याच्या निर्णयाला आक्षेप होता. घटनेनुसार संस्थेची निवडणूक घेण्याऐवजी परस्पर नव्या अध्यक्षाचे नाव घोषित करण्याला आक्षेप आहे. या निर्णयाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागण्यात येणार आहे. – सुनील महाजन, मावळत्या कार्यकारिणीतील सहकार्यवाह