अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे असेल, तर एकूण मतांमधून १७५ मते आधीच वगळा आणि उर्वरित मतदारांशी संपर्क साधा. याचे कारण मराठवाडा साहित्य परिषदेची अपुरी मतदार यादी. हा योगायोग यंदा सलग तिसऱ्या वर्षी घडून आला आहे. मात्र, घटक संस्थेवर कारवाई करण्यासंदर्भात साहित्य महामंडळाच्या घटनेमध्ये कोणतीही तरतूद नसल्यामुळे महामंडळाचे पदाधिकारी हतबल आहेत.
साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यापूर्वी घटक संस्थांकडून मतदारांची अद्ययावत यादी मागविली जाते. यामध्ये मतदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी आणि मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ता अशी सर्व माहिती देणे आवश्यक असल्याचे साहित्य महामंडळाने कळवले आहे. केवळ मराठवाडा साहित्य परिषदेचा अपवाद वगळला तर, अन्य सर्व घटक संस्था या निर्णयाची तीन वर्षांपासून कार्यवाही करीत आहेत. या अपुऱ्या यादीमुळे मराठवाडय़ातील मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे हा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून उमेदवारांना पडत आहे.
मराठवाडय़ातील मतदारांची यादी सविस्तर नसल्याची माहिती गेल्या वर्षी अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी दिली. थोडक्या कालावधीमध्ये सर्वच मतदारांना प्रत्यक्ष भेटणे अशक्य असल्याने किमान दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधावा म्हटले तर, यादीच अपुरी असल्याचे ध्यानात आले. टपाल खर्चामध्येही वाढ झाली असल्यामुळे ई-मेलद्वारे संपर्क साधणे सोयीचे ठरते. मात्र, १७५ मतदारांपर्यंत पोहोचणे कोणत्याही उमेदवाराला शक्य नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मराठवाडा साहित्य परिषदेची यादी त्रोटक असल्याचे माजी संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी सांगितले. मतदारांचे नाव आहे, पण पत्ते पुरेसे नाहीत. काहींचे दूरध्वनी चुकीचे आहेत. त्यामुळे मराठवाडय़ामध्ये मतदारांपर्यंत संपर्काद्वारेही पोहोचणे शक्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले. संमेलनाध्यक्षपदासाठी सध्या उमेदवार असलेल्या ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांनी आपल्यालाही याच अनुभवाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.
यासंदर्भात साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, मतदार यादी कशा पद्धतीने हवी यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, मराठवाडा साहित्य परिषदेकडून अपुरी माहिती असलेली यादी येते हा अनुभव आहे. मात्र, घटक संस्थेवर कारवाई करण्यासंदर्भात घटनेमध्ये कोणतीही तरतूद नाही. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असता, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही.