पिंपरी : श्री क्षेत्र देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत  अध्यक्षपदी जालिंदर विश्वनाथ मोरे हे विजयी झाले. तर, विश्वस्तपदी विक्रम मोरे, वैभव मोरे, गणेश मोरे, उमेश मोरे, दिलीप मोरे, लक्ष्मण मोरे निवडून आले आहेत. श्री क्षेत्र देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानच्या अध्यक्ष व विश्वस्तांची निवडणूक प्रक्रिया  सोमवारी (३१ मार्च) येथील पित्ती धर्मशाळेत पार पडली. धर्मशाळेत सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडले. सायंकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. नऊ वाजता मोजणी पार पडली.

देहूगाव संस्थानच्या आबाजीबुवा, गणेशबुवा आणि गोविंदबुवा अशा तीन शाखा आहेत. या शाखेतून प्रत्येकी दोन असे सहा विश्वस्त निवडले जातात. तर, प्रत्येक शाखेतून दोन वर्षासाठी एक अध्यक्ष निवडला जातो. निवडून आलेले सहा विश्वस्त आणि प्रत्येक दोन वर्षांनी निवडला जाणारा अध्यक्ष हे पुढील सहा वर्षे देवस्थानचा कारभार सांभाळणार आहेत. आबाजीबुवा शाखेतून ९, गणेशबुवा शाखेतून १४१ आणि गोविंदबुवा शाखेतून १४७ असे एकूण ३७८ मतदार आहेत.

 संस्थानच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार होते. तर, विश्वस्त मंडळासाठी १९ उमेदवार रिंगणात होते. यंदाचे अध्यक्षपद हे चक्राकार पद्धतीप्रमाणे गोविंदबुवा शाखेकडे असल्याने अध्यक्षपदासाठी गोविंदबुवा शाखेकडून विश्वजित मोरे, कैलास मोरे, जालिंदर मोरे या तिघांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यांपैकी जालिंदर मोरे यांना १६३ मते मिळाली. ते ६३ मतांनी निवडून आले.

देहूगाव संस्थानच्या आबाजीबुवा, गणेशबुवा आणि गोविंदबुवा अशा तीन शाखा आहेत. या शाखेतून प्रत्येकी दोन असे सहा विश्वस्त निवडले जातात. गोविंदबुवा शाखेतून विद्यमान विश्वस्त संजय मोरे, विक्रमसिंग मोरे, अशोक मोरे, जयसिंग मोरे, वैभव मोरे, रोहन मोरे, विवेक मोरे निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी विक्रम मोरे, वैभव मोरे हे ४२ मतांनी निवडून आले. गणेशबुवा शाखेकडून विद्यमान विश्वस्त अजित मोरे, श्रीराम मोरे, धनंजय मोरे, उमेश मोरे, सचिन मोरे, गणेश मोरे निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी गणेश मोरे हे ३५ तर उमेश मोरे २६ मतांनी निवडून आले. आबाजीबुवा शाखेकडून विक्रम मोरे, भास्कर मोरे, दिलीप मोरे, जयंत मोरे, अमोल मोरे, लक्ष्मण मोरे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातून दिलीप मोरे, लक्ष्मण मोरे दोघे निवडून आले.

ही प्रक्रिया शांततेत पार पडली. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अंकुश मोरे, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून सुजित मोरे आणि शामकांत मोरे यांनी कामकाज पाहिले.