शिरुर: शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीच्या निकाला नंतर खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी आमदार ज्ञानेश्वर कटके गटाचा की माजी आमदार अशोक पवार गटाच्या उमेदवाराची वर्णी लागणार याकडे राजकिय वर्तूळाचे लक्ष लागले आहे . शिरूर तालुका खरेदी विक्री संघ संचालक मंडळाच्या १७ जागांची पंचवार्षिक निवडणूक झाली . त्यात १७ पैकी १२ संचालक बिनविरोध निवडून आले . तर ५ जागा करीता ९ मार्च रोजी निवडणूक झाली .
१२ बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे – किसन गवारे , नामदेव गिरमकर , लहू थोरात , राजेंद्र नरवडे , गुलाब सातपुते , बाळासाहेब टेमगिरे , कानिफनाथ भरणे , विवेक सोनवणे ,मनिषा शेलार , सुजाता नरवडे, संभाजी भुजबळ , शरद कालेवार रविवारी (ता. ९) झालेल्या निवडणुकीत माजी आमदार ॲड अशोक पवार समर्थक ५ संचालक विजयी झाले . संघाच्या १७ पैकी १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, त्यातील दहा जागांवर आमदार ज्ञानेश्वर कटके समर्थक निवडून आल्याचा दावा कटके गटाचा वतीने करण्यात येवून त्याच्या सत्कार ही करण्यात आला होता .
खरेदी विक्री संघाच्या संचालक निवडणूकीत आमदार कटके समर्थक दहा तर माजी आमदार पवार समर्थक सात संचालक निवडुन आले आहेत .निवडणूकी नंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत राजकीय घडामोडी होवून काही चमत्कार घडणार का याबाबतीत राजकिय वर्तूळात उत्सुकता आहे .
काल झालेल्या निवडणुकीत मांडवगण फराटा व वडगाव रासाई गटातुन खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नागवडे विजयी झाले. त्यांना १४, तर त्यांचे प्रतिस्पर्धा गणेश साळुंके यांना १३ मते मिळाली. वडगाव रासाई गटातून विजयी झालेले सुरेशचंद्र ढवळे यांना ११, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शरद साठे यांना दहा मते मिळाली. वैयक्तिक सभासद मतदार संघाच्या दोन जागांवर ११३१ मते मिळवून संघाचे विद्यमान संचालक सर्जेराव दसगुडे व १११५ मते मिळवून नवनाथ ढमढेरे विजयी झाले . शेतकरी नेते नितीन थोरात हे पराभूत झाले .टाकळी हाजी गटातून महेंद्र सुरेश पाचर्णे विजयी झाले त्यांनी प्रमोद दंडवते यांचा पराभव केला .
पाच जागांसाठी चे निकाल जाहीर झाल्यावर माजी आमदार अशोक पवार यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला .निवडी नंतर माजी आमदार अशोक पवार यांनी निवडून आलेल्या संचालकाचे अभिनंदन केले .