साहेब अमुक भागातून बोलतोय.. आमच्या भागात काही माणसे पैसे वाटत आहेत.. पोलिसांना लवकर पाठवून द्या.. गेल्या तीन दिवसांपासून असे अनेक फोन कॉल्स पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाकडे येत आहेत. त्याची दखल घेत तत्काळ गस्तीवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठविले जाते. मात्र, त्या ठिकाणी गेल्यावर काहीच आढळून येत नाही. एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी लढविलेल्या क्लृप्त्यामुळे असे फोन केले जात असून त्यामुळे पोलीस हैराण झाले आहेत.
विधानसभेच्या मतदानाला आता काही तासच शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीत पैशाचा वापर होऊ नये म्हणून पाहणी करण्यासाठी प्रशासनाकडून भरारी आणि विशेष भरारी व देखरेख पथके तैनात केली आहेत. त्यांच्याकडून शहरात गस्त व तपासणी केली जात आहेत. मतदानाला आता काही तास शिल्लक राहिल्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे. भेटी-गाटीच्या प्रचारावर भर दिला जात आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते, रात्री विरोधक पैसे, भेट वस्तू वाटप करीत नाहीत ना याची पाहणी करीत फिरत आहेत. जरा एखाद्या गल्लीत काही कार्यकर्ते दिसले, तर त्यांना,विचारण्यापेक्षा थेट पोलीस नियंत्रण कक्षाच्या शंभर क्रमांकावर फोन करून अमुक भागात पैशाचे वाटप होत असल्याचे कळविले जाते.
निवडणूक आयोगाच्या निर्देषानुसार पैसे वाटप करीत असल्याची तक्रार आल्यास त्या ठिकाणी गस्तीवरील पोलिसांबरोबरच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली पाहिजेत, अशा सूचना आहेत. त्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या प्रत्येक तक्रारीच्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन भेट द्यावी लागत आहे. सोसायटय़ा, झोपडपट्टी, चाळी या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते फिरत असल्यास विरोधाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. थोडीही गडबड वाटल्यास पोलीस नियंत्रण कक्षास फोन करून तक्रार केली जाते. रात्रीच्या वेळी अनेक फोन नियंत्रण कक्षाकडे येत आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना काही कार्यकर्ते गप्पा मारीत बसल्याचे आढळून येते. तर, काही जण पोलिसांना पाहून ‘आताच जेवून आलो साहेब..’ असे सांगितले जाते. परस्पर हेवेदावे आणि संशयातून कार्यकर्ते नियंत्रण कक्षाला फोन करीत आहेत. नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारीत तथ्य आढळून येत नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून अशा फोन कॉल्सची संख्या वाढली आहे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी हे फोन कॉल्स आणखी वाढतील. मात्र, या फोन कॉल्सचा पोलिसांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.