विधानसभेच्या निवडणुकीचे आतापर्यंत शांत असलेले वातावरण आता तापायला लागले असून अर्ज भरण्याची प्रक्रिया मार्गी लागली की जाहीर प्रचाराला सुरुवात होईल. या प्रचारात मतदारसंघासाठी आम्ही काय केले हे विद्यमान आमदार सांगत राहतील आणि विरोधक विद्यमान आमदारावर टीका करत ते निवडून आले, तर काय करतील हे सांगत राहतील. हे जाहीर बोलण्याचे मुद्दे असले, तरी प्रत्येक मतदारसंघातील कळीचे मुद्दे वेगळेच असतात. ते लोकांसमोर येतच नाहीत. मात्र त्यातील काही मुद्दे निवडणूक सुरू असतानाही उद्भवत असतात हे नक्की. प्रत्येक मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न वेगळे असतात, मतदारसंघाचे म्हणून प्रश्न वेगळे असतात आणि कळीचे मुद्दे वेगळे असतात. काय आहेत हे कळीचे मुद्दे त्यावर प्रकाशझोत ..
वडगावशेरी:
विद्यमान आमदार- बापू पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस)
युतीच्या जागा वाटपात – ही जागा शिवसेनेकडे
नागरिकांचे प्रश्न कोणते?- पाण्याचा मुख्य प्रश्न अनेक भागात आहे. मतदारसंघातील शहरी भागात प्रशस्त रस्ते व अन्य सुविधा उपलब्ध झाल्या; पण ग्रामीण भागात या सुविधा आजही नाहीत. रखडलेली बीआरटी हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. या भागातील गुंठेवारीची बांधकामे आणि अन्य बांधकामे नियमित करण्याचाही प्रश्न सुटलेला नाही.
कळीचा मुद्दा – विद्यमान आमदार बापू पठारे येथून पुन्हा लढत असले, तरी मतदारसंघातील त्यांच्याच पक्षातील मंडळींची नाराजी हे पठारे यांच्या समोरचे मुख्य आव्हान आहे. त्यांना येथून कोण लढत देणार हाही विषय येथे खूप चर्चेचा झाला होता. मात्र, आता राष्ट्रवादीचेच माजी नगरसेवक सुनील टिंगरे शिवसेनेकडून पठारे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील, असे चित्र आहे. त्यामुळे पठारे यांना ते चांगली टक्कर देतील.
कसबा
विद्यमान आमदार- गिरीश बापट (भाजप)
आघाडीच्या जागा वाटपात – ही जागा काँग्रेसकडे
नागरिकांचे प्रश्न कोणते?- जुन्या आणि मध्य पुण्यातील मोठा भाग कसब्यात असल्यामुळे येथील वाडय़ांचा प्रश्न सातत्याने गाजत आहे. वाडय़ांचा पुनर्विकास हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे प्रश्नही सुटलेले नाहीत. बाजारपेठांच्या भागातील अतिक्रमणे आणि पार्किंग याही समस्या या मतदारसंघात भेडसावत आहेत.
कळीचा मुद्दा- गिरीश बापट येथून पाचव्यांदा लढतीसाठी उत्सुक आहेत. मात्र पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी त्यांना आव्हान देत कसब्यातून उमेदवारी मागितली आहे. असे चित्र यापूर्वी कधी दिसले नव्हते. काँग्रेसकडूनही रोहित टिळक, अरविंद शिंदे आणि कमल व्यवहारे यांनी उमेदवारी मागितल्यामुळे त्या आघाडीवरही अस्वस्थताच आहे. एकुणात मतदारांची नाही; पण पक्षांतर्गत अस्वस्थतेची मॅनेजमेंट हाच येथील कळीचा मुद्दा आहे.
कोथरूड
विद्यमान आमदार – चंद्रकांत मोकाटे (शिवसेना)
आघाडीच्या जागा वाटपात – ही जागा राष्ट्रवादीकडे
नागरिकांचे प्रश्न कोणते?- जुन्या सोसायटय़ांचा पुनर्विकास, सोसायटय़ांची जागा त्यांच्या मालकीची होण्याचा प्रश्न तसेच काही भागातील झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन हे प्रश्न सुटलेले नाहीत. मेट्रोचा मार्ग, त्यासाठीचा चार एफएसआय, कर्वे रस्त्यासह अनेक भागातील वाहतुकीची कोंडी, नदीकाठच्या पर्यायी रस्त्याचा रखडलेला प्रस्ताव याही समस्या कायम आहेत.
कळीचा मुद्दा- शिवसेनेच्या धोरणाप्रमाणे चंद्रकांत मोकाटे हेच पुन्हा निवडणूक मैदानात उतरणार असले, तरी राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवाराचा शोधच सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी कोणाला तरी उभे राहायला सांगणार असेच चित्र आहे. भाजपची या मतदारसंघात चांगली ताकद आहे आणि भाजपला कुशलतेने बरोबर घेऊन जाणे एवढाच कळीचा मुद्दा आता सेनेपुढे आहे.