‘निवडणुकीचा पत्ता नाही, खासदारांच्या बहुमताचा पत्ता नाही, तरी पंतप्रधान ठरवून टाकणे हे यापूर्वी कधी घडले नव्हते. बरे, पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला कमीत कमी देशाचा आणि स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास तरी माहीत असायला हवा! मोदींनी वध्र्यात केलेल्या भाषणात ‘गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा वध्र्यातून दिला होता, असे सांगितले. नशीब त्यांनी ती घटना आपल्या गावी गुजरातमध्ये घडल्याचे सांगितले नाही!’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री यांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.  
आघाडीचे पुण्याचे लोकसभा उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांनी बुधवारी सकाळी आपला उमेदवारीअर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीची सभा झाली. या वेळी पवार बोलत होते. विश्वजित कदम, सुप्रिया सुळे (बारामती), राहुल नार्वेकर (मावळ) आणि देवदत्त निकम (शिरूर) या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ या वेळी फोडण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे या वेळी उपस्थित होते.  
मोदींवर टीका करताना पवार म्हणाले, ‘‘कच्छमध्ये भूकंप झाला, तेव्हा महाराष्ट्रातील जनतेने कोटय़वधी रुपये दिले होते. गेल्यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडला, तेव्हा गुजराथमधील मेहसाणा, अमूल या संघांनी पशुखाद्य मोफत पुरवले. मात्र मोदी सरकारने पशुखाद्य पुरवणाऱ्या संघाला नोटिस पाठवून गुजराथमध्ये दुष्काळ असताना महाराष्ट्रात पशुखाद्य का पाठवले, अशी विचारणा केली आहे. ज्या व्यक्तीला साधी माणुसकीची भूमिका घेता येत नाही, तो देशातील सर्व लोकांना न्याय देऊ शकत नाही. ‘आम्हाला काँग्रेसमुक्त देश हवा,’ असे त्यांचे म्हणणे आहे. पण आम्हाला देश जातीयतावादमुक्त करायचा आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासारख्या प्रवृत्तीला खडय़ासारखे बाजूला काढायला हवे.’’
मुख्यमंत्र्यांनीही मोदींचा इतिहासाच्या चुकलेल्या संदर्भाचा मुद्दाच उचलून धरला. ते म्हणाले,‘‘या सद्गृहस्थांना स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास तर माहीत नाहीच पण स्वत:चा भारतीय जनता पक्ष ज्या व्यक्तीने स्थापन केला, त्या व्यक्तीचे नावही त्यांना माहीत नाही. ‘कसाही करून मी विजय मिळवणारच,’ ही हुकूमशाहीची लक्षणे आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातच्या विकासाची जाहीर तुलना करण्यास मी तयार आहे. मोठय़ाने खोटे बोलत राहिले की लोक विश्वास ठेवतात असे नाही. संघ जेव्हा आपला उमेदवार पुढे करतो तेव्हा कलम ३७०, समान नागरी कायदा, राम मंदिराचा मुद्दा हे मुद्दे भाजपने सोडले आहेत की अजूनही ते राबवणार आहेत हे लोकांना कळायला हवे.’’
‘मावळचा उमेदवार महत्त्वाचा’
राहुल नार्वेकर यांच्याविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ते आपले मेहुणे असल्यामुळे ते निवडून आलेच पाहिजेत असे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘आपलाच उमेदवार येणार या भ्रमात कार्यकर्त्यांनी राहू नये. दारोदार प्रचार झालाच पाहिजे. मावळची सीट मात्र प्रथम क्रमांकाने निवडून आलीच पाहिजे; बाकीचे आपण बघून घेऊ!’’
‘..त्यांनीच आमचा केसाने गळा कापला’
‘रिपब्लिकन, दलित व अल्पसंख्याक जनतेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी जातीयवादी कळपात सामील होऊन आमचा केसाने गळा कापला,’ या शब्दांत जोगेंद्र कवाडे यांनी रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर थेट टीका केली. मोदी आणि आप बद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘मोदी सरकार आले तर जनतेच्या तोंडाला कुलूप लागून त्यांना तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करावा लागेल. ज्याच्या बापाचा पत्ता नाही असा ‘आप’ पक्ष आहे. परिवर्तनाऐवजी ज्यांनी पळपुटेपणा दाखवला त्यांच्या मागे तरुणांनी जायची गरज नाही.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा