पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ात प्रमुख पक्षांतर्फे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आठही महिला उमेदवारांना मतदारांनी भरघोस मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालाद्वारे स्पष्ट झाले आहे. या आठ उमेदवारांपैकी केवळ दोघी जणींनी निवडून विधानसभेत प्रवेश केला असला तरी तीन महिला उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी झुंज दिली. भारतीय जनता पक्षाच्या तीन महिला उमेदवारांपैकी माधुरी मिसाळ आणि मेधा कुलकर्णी विजयी झाल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. मात्र, विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिला आरक्षणाचे विधेयक अद्यापही संमत झालेले नाही. या पाश्र्वभूमीवर महिलांचा उमेदवारीसाठी विचार अभावानेच केला जातो. पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांची लढत काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्याशी होती. मात्र, शहरामध्ये सर्वाधिक मताधिक्याने त्यांनी विजय संपादन केला. कोथरूड मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांनी एक लाखांहून अधिक मते संपादन करीत भाजपची ताकद दाखवून दिली आहे. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला. िपपरी मतदारसंघामध्ये भाजप महायुतीतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे आणि भोसरी मतदारसंघात शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराशी जोरदार लढत दिली. भोसरीमध्ये सुलभा उबाळे यांनी विद्यमान आमदार विलास लांडे यांच्यापेक्षा अधिक मते घेत दुसरे स्थान संपादन केले. चंद्रकांता सोनकांबळे या तिसऱ्या स्थानावर असल्या तरी त्यांना विजयासाठी केवळ ३ हजार ८०८ मते कमी पडली.
जुन्नर मतदारसंघात आशाताई बुचके यांना विजय संपादन करता आला नाही. मात्र, दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून त्यांनी आमदार वल्लभ बेनके यांचे पुत्र अतुल बेनके यांना तिसऱ्या स्थानावर धाडले. पुरंदर मतदारसंघामधील संगीताराजे िनबाळकर, शिरुर मतदारसंघातील संध्या बाणखेले आणि खेडमधील वंदना सातपुते यांना मात्र पुरेशी लढत देता आली नाही. यापैकी संध्या बाणखेले आणि वंदना सातपुते यांना अडीच हजारांपेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

Story img Loader