लोकसभेत जाऊन पुणेकर तसेच पिंपरी आणि मावळवासीयांची सेवा करण्यासाठी मते मागत असलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांची मालमत्ता पाहून मतदार चकित होत असून उमेदवारीअर्ज भरताना दाखवलेली वैयक्तिक संपत्ती एवढी असेल, तर प्रत्यक्ष संपत्ती केवढी असेल अशी चर्चा पुण्यात आहे.
विविध राजकीय पक्षांचे उमेदवार पुणे आणि मावळ लोकसभेसाठीचे उमेदवारीअर्ज गेले दोन दिवस भरत आहेत. उमेदवारी अर्जाबरोबर संपत्तीचे जे विवरणपत्र आणि शपथपत्र उमेदवारांनी सादर केले आहे ते पाहून उमेदवारांच्या बरोबरचे कार्यकर्तेही चक्रावले आहेत. वैयक्तिक तसेच पत्नी व मुलांच्या नावावर नोंद असलेली ही उमेदवारांची संपत्ती असून त्याशिवाय त्यांनी अन्यत्र केलेली गुंतवणूक किती असू शकेल अशीही चर्चा रंगत आहे.
विश्वजित कदम: १३८ कोटी ७७ लाख
काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्याकडे ७४ कोटी ६३ लाख रुपयांची आणि पत्नी स्वप्नाली यांच्याकडे ६४ कोटी पाच लाख अशी १३८ कोटी ७७ लाखांची मालमत्ता आहे. मुदतठेवी, समभाग, रोकड तसेच दागिने, शेती आदी विविध प्रकारची मालमत्ता असल्याचे कदम यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दोघांच्या नावावर वैयक्तिक कर्जही आहे. विश्वजित यांच्या नावावर वाहन नसले, तरी पत्नीच्या नावावर मात्र अनेक आलिशान मोटारी आहेत. पुणे आणि सातारा जिल्ह्य़ात त्यांच्या नावावर जमिनी असून मुंबईत तसेच पुण्यात सदनिका आहेत.
अनिल शिरोळे: २२ कोटी ७५ लाख
भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे व त्यांची पत्नी यांच्या नावाने २२ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे विवरणपत्रातून जाहीर झाले आहे. शिरोळे यांच्या पत्नीच्या नावे हॉटेल व्यवसाय आहे. दोघांकडेही मिळून चार लाखांची रोकड असल्याची माहिती शिरोळे यांनी अर्ज भरताना सादर केली आहे. त्यांच्याकडे मर्सिडीजसह अन्यही गाडय़ा आहेत. तसेच पत्नीच्या नावे दोन बीएमडब्ल्यू गाडय़ा आहेत. तसेच मुळशी तालुक्यात जमीनही आहे.
दीपक पायगुडे: ११ कोटी ४३ लाख
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक पायगुडे यांच्याकडे ११ कोटी ४३ लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यात सात कोटींची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावाने ६० लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.
प्रा. सुभाष वारे: ७६ लाख
आम आदमी पक्षाचे प्रा. सुभाष वारे यांच्या मालमत्ता विवरणपत्रात काय असेल याची चर्चा होती. प्रा. वारे यांनी स्कूटर, शेतजमीन आणि एक इमारत आदी मिळून ७६ लाखांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे.
श्रीरंग बारणे: ६७ कोटी ९१ लाख
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडे ६६ कोटी ९१ लाख रुपयांची मालमत्ता असून त्यात ऑडी, मर्सिडिज, टोयाटो फॉच्र्युनर या तीन आलिशान मोटारी व एक परदेशी बनावटीचे रिल्हॉल्व्हर यांचा समावेश आहे. त्यांच्या नावे रोख ३८ लाख ५० हजार रुपये, पत्नीच्या नावे रोख ९ लाख रुपये व दोन मुलांच्या नावे २५ लाख रुपये रोख आहेत. वडिलोपार्जित जमीन, बिगरशेती जमीन, व्यावसायिक इमारत, सदनिका असे एकूण ४६ कोटी ६७ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे आहे. बँकेतील ठेवी, विविध बँका, पंतसंस्था व कंपन्यांचे शेअर्स, विमा पॉलिसी, पोस्टातील ठेवी, सोने व भागीदारीतील गुंतवणूक असे एकूण पाच कोटी ७५ लाख रुपये असून पत्नी सरिता बारणे यांच्या नावे १३ कोटींची मालमत्ता आहे.
लक्ष्मण जगताप: १२ कोटी
मावळ लोकसभा लढत असलेले लक्ष्मण जगताप यांनी १२ कोटींची मालमत्ता असल्याचे सांगताना त्यांच्याकडे एकही वाहन नसल्याची माहिती नोंदवली आहे. जमीनजुमल्यासह एकूण १२ कोटींची मालमत्ता जगताप यांच्याकडे आहे. त्यामध्ये वडिलोपार्जित जमिनीसह अन्य मालमत्ता ३ कोटी २४ लाख रुपयांची असून रोकड एक लाख ४४ हजार रुपये आहे. बँकेतील ठेवी, पतसंस्था, शेअर्स, विमा पॉलिसी, सोने व भागीदारीतील गुंतवणूक अशी एक कोटी ४२ लाख रुपयांची गुंतवणूक असून जगताप यांनी केली आहे. एक रिव्हॉल्व्हर व एक पिस्तूल असल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Story img Loader