आपल्या पाठीमागे किती जनमत आहे हे आजमावण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये हौशे-नवशे उतरले आहेत. यामध्ये केवळ प्रसिद्धी हा एकमेव हेतू कित्येकदा डोळ्यासमोर असतो. तर, जातीच्या मतांचे बेरजेचे गणित साधणे हा देखील उद्देश असतो. हौसेखातर अनेक जण निवडणूक लढविणार असे घोषित करीत असले तरी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर ‘अर्थपूर्ण’ घडामोडी होऊन यापैकी अनेक गायब होतात हे चित्र देखील पाहावयास मिळते.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या जोडीला छोटय़ा पक्षांचे आणि आघाडय़ांचे अन्य उमेदवार देखील रिंगणामध्ये असणार आहेत. महापालिका आणि विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मतदारांपर्यंत पोहोचणे कित्येकदा उमेदवारांना अवघड होऊन बसते. त्यातुलनेत लोकसभेचा मतदारसंघ हा विस्ताराने मोठा असतो. अपुरे मनुष्यबळ आणि प्रचाराची तोकडी साधने घेऊन अपक्ष उमेदवार कसे पोहोचणार हा प्रश्न भेडसावत असला तरी पावसाळी छत्र्यांप्रमाणे हे उमेदवार आपले बळ आजमावण्यासाठी रिंगणात दाखल होतात.
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील शिरुर लोकसभा मतदारसंघात दिनेश मस्कुले, माढा मतदारसंघात सुनील जाधव आणि सांगली मतदारसंघामध्ये पंडितराव बोराडे अशा तीन जागा लढविण्यात येणार आहेत. दयाराम भंडलकर हे रामोशी-बेरड समाजाचे नेते विधान परिषदेचे आमदार होते. मात्र, १९७२ नंतरच्या कालावधीत समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही. सर्वच राजकीय पक्षांनी समाजाच्या मतांचा वापर करून घेतल्यामुळे यंदा आम्हीच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकशाही आघाडीतर्फे कामगार नेते नाना क्षीरसागर हे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. इंटकचे प्रदेश संघटकपद देण्याचे आश्वासन खासदार सुरेश कलमाडी यांनी दिल्यामुळे गेल्या निवडणुकीत आपण माघार घेतली होती. मात्र, कलमाडी यांनी आपली फसवणूक केल्याचा दावा क्षीरसागर यांनी केला. युवा दलित पँथरतर्फे पुणे लोकसभा मतदारसंघातून गोदासूबाला केशवलू यांची, तर शिरुर मतदारसंघातून बिभीषण लांडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माढा आणि उस्मानाबाद या मतदारसंघातील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संजय नडगेरी यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी यंदाही हौशे-नवशे-गवशे रिंगणात!
हौसेखातर अनेक जण निवडणूक लढविणार असे घोषित करीत असले तरी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर ‘अर्थपूर्ण’ घडामोडी होऊन यापैकी अनेक गायब होतात हे चित्र देखील पाहावयास मिळते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-03-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election publicity stunt candidates