मावळ लोकसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्याकडे पहिल्या दिवसापासून ‘डमी’ उमेदवार आणि ‘बळीचा बकरा’ म्हणून पाहिले जाते, ही चर्चा खोडून काढण्यासाठी ‘पुढाकार’ घेतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी नार्वेकरांचा उमेदवारी अर्ज भरताना आवर्जून हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले. आमदार अण्णा बनसोडे यांचे चिंचवड येथील कार्यालय हेच नार्वेकरांचे प्रचार कार्यालय राहणार असून त्याचे औपचारिक उद्घाटनही अजितदादांच्या हस्ते होणार आहे.
लक्ष्मण जगताप यांच्या स्वतंत्र उमेदवारीने गोत्यात आलेल्या राष्ट्रवादीने अंतिम क्षणी शिवसेनेतून आलेल्या नार्वेकरांची उमेदवारी जाहीर केली. तथापि, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नगरसेवक त्यांच्या प्रचारात सहभागी होताना दिसत नाहीत. अशा मंडळींना अजितदादांनी यापूर्वीच दमात घेतले आहे. ‘दिवसा एक, रात्री एक’ असे करू नका, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे काम करा, अन्यथा माझ्याशी गाठ आहे, मला पदे देता येतात तर काढूनही घेता येतात, अशी भाषा अजितदादांनी वापरली आहे. मात्र, तरीही जगतापांचा अर्ज भरताना मोठय़ा संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी हजर होते, त्याची माहिती अजितदादांपर्यंत गेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवारीअर्ज भरताना ते स्वत: उपस्थित राहणार असून योग्य तो संदेश कार्यकर्त्यांना देणार आहेत. या वेळी काँग्रेसचे संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील हे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता चिंचवडच्या मोरया गोसावी येथून राष्ट्रवादीची रॅली निघणार असून अकराच्या सुमारास अर्ज दाखल होणार आहेत. त्यानंतर, पुण्यात होणाऱ्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेला सर्व जण रवाना होणार असल्याचे माजी महापौर नानासाहेब शितोळे यांनी कळवले आहे.

Story img Loader