पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासंबंधी गेले पाच-सहा दिवस सुरू असलेल्या चर्चेवर अखेर खासदार सुरेश कलमाडी यांनी पडदा टाकला असून काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांना पाठिंबा देऊन कलमाडी यांनी निवडणूक रिंगणातून मंगळवारी माघार घेतली. तसे पत्रही त्यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे. कदम यांना मोठय़ा बहुमताने निवडून द्यावे असेही आवाहन कलमाडी यांनी केले आहे.
काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतरही कलमाडी निवडणूक रिंगणात उतरणार, का बाहेर राहणार याबाबत अनिश्चितता होती. माझ्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत मला सावलीसारखी साथ देणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याशी विचारविनिमय करणे मी महत्त्वाचे मानले. गेल्या काही दिवसांत कार्यकर्त्यांबरोबर माझ्या बैठकाही झाल्या. सामाजिक कार्यकर्त्यांशीही माझी चर्चा झाली. सर्वानी निर्णय करून माझ्यावर निर्णय सोपवला आणि पुण्याच्या दीर्घ हिताचा विचार करून काँग्रेसच्या विश्वजित कदम यांच्या उमेदवारीस बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करताना मला आनंद होत आहे, असे कलमाडी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पुण्याचा विकास हाच माझा ध्यास राहिला आहे. पुण्याचे पुणेरीपण टिकवत विकासाचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मी आणू शकलो. तसेच शहराच्या विकासासाठी देखील अनेक योजना राबवू शकलो. त्याचे मोठे समाधान मला आहे. विकासाची ही प्रक्रिया विश्वजित कदम यांनी पुढे निरंतर चालू ठेवावी. तसा प्रयत्न ते करतील अशी आशा मला आहे. पुण्याशी माझे भावनिक नाते आहे. पुण्याचे नाव सदैव उंच राहावे यासाठी मी सतत प्रयत्न केला. पुणेकरांचा मी सदैव ऋणी आहे. पुणेकरांचे प्रेम आणि जिव्हाळा मला सदैव लाभला. यापुढेही पुणेकरांसाठी, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी सदैव उपलब्ध असेन, असेही कलमाडी यांनी या पत्रकात नमूद केले आहे.