हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती, उच्चरवाने दिल्या जाणाऱ्या झिंदाबादच्या घोषणा, शेकडो झेंडे, नेत्यांची फौज, नागरिकांना अभिवादन आणि शहरभर सुरू असलेल्या राजकीय पक्षांच्या पदयात्रा, प्रचारफेऱ्या.. पुण्याच्या राजकीय आघाडीवर असा माहोल तयार झाल्यामुळे आली.. निवडणूक आली.. हा संदेश आता पुणेकरांना मिळाला आहे आणि सर्वच राजकीय पक्षांना गेले तीन आठवडे जे ताण-तणावाचे गेले तो ताणही आता हलका झाला आहे.
उमेदवारांची निश्चिती करण्यासाठी पुरेसा घोळ घातल्यानंतर राजकीय पक्षांचे उमेदवार ठरले असले, तरी ते ठरवतानाही नेतृत्वाने कार्यकर्त्यांची परीक्षाच पाहिली. सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा लढणार का नाही हा ताण पक्षाच्या कार्यकर्त्यांना होता. पाठोपाठ नितीन गडकरी-राज ठाकरे भेट झाली आणि ताण आणखीनच वाढला. अखेर पुण्यातून दीपक पायगुडे यांची उमेदवारी जाहीर झाली. तरीही त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत ‘राज साहेबांनी दुसरा उमेदवार दिला, तरीही मी त्याचे काम अगदी निष्ठेनेच करीन,’ असे जाहीर केले आणि पुन्हा सगळ्यांना ताण दिला. पायगुडे लढणार, का अन्य कोणी लढणार, का मनसे माघार घेणार हेच पक्षात कोणाला समजेनासे झाले. मात्र, पायगुडे यांचा अर्ज मंगळवारी मोठे शक्तिप्रदर्शन करून दाखल झाला आणि ताण एकदाचा हलका झाला.
पुण्यात विनायक निम्हण का मोहन जोशी का अभय छाजेड का विश्वजित कदम का कमल व्यवहारे याची चर्चा गेला महिनाभर सुरू होती. अखेर कदम यांनी उमेदवारी खेचून आणली. तरीही दिल्लीतून पुण्यात परतलेले खासदार सुरेश कलमाडी यांनी ताण दिलाच. शिवाय पक्षातल्या इतर मंडळींनीही जाहीर नाराजी दाखवायला सुरुवात केली. कलमाडी ही मंडळी निवडणुकीत काय करणार हा ताण काँग्रेसच्या उमेदवारासाठी अगदी कालपर्यंत होता. अखेर मंगळवारी कलमाडी यांनी विश्वजित कदम यांना पाठिंबा जाहीर करून तो ताणही आता संपवला आहे आणि सर्व नेतेही प्रचारात दिसत आहेत.
भाजपमध्येही अनिल शिरोळे का गिरीश बापट का प्रदीप रावत का प्रकाश जावडेकर हा ताण रविवापर्यंत कायम होता. अखेर पक्षाच्या संकेतस्थळावरून रविवारी रात्री शिरोळे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि कार्यकर्त्यांचा ताण एकदाचा संपला. उमेदवारीचा ताण संपला, तरी लगेचच बातमी आली, की बापट यांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. तातडीने शिरोळे कार्यालयात पोहोचण्याआधी बापट यांच्या घरी पोहोचले आणि दोघांची भेट होऊन तोही ताण संपला. जोरदार शक्तिप्रदर्शन करत बुधवारी शिरोळे यांनी उमेदवारीअर्ज दाखल केला आणि गेल्या तीन आठवडय़ांचा ताण संपल्याचीच भावना महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा