विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार तयारीला लागले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी हाय टेक यंत्रणा वापरण्यावर या वेळी उमेदवारांचा भर राहील, असे चिन्ह आहे. पुण्यातील काँग्रेसच्या एका इच्छुक उमेदवाराने त्याचा कार्यअहवाल वॉटस् अॅपवर आणला आहे आणि हा अहवाल सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमधील इच्छुकांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू असून अनेक इच्छुक वेगवेगळ्या कल्पना लढवत असल्याचे दिसत आहे. कसबा मतदारसंघातून विधानसभा लढण्यासाठी काँग्रेसचे नितीन गुजराथी इच्छुक असून त्यांनी काँग्रेस भवनात आणि मुंबईत टिळक भवनात जाऊन मुलाखतही दिली आहे. गुजराथी यांच्याकडे सध्या शहर चिटणीस हे पद आहे आणि कसब्यातून लढण्यासाठी त्यांनी हायटेक तयारी केली आहे.
निवडणूक लढवणारे उमेदवार मतदार स्लिप, पक्षाचे आवाहन पत्रक तसेच कार्यअहवाल घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत पोहोचवतात, ही आतापर्यंतची पद्धत आहे. पण त्याहीपुढे जाऊन गुजराथी यांनी त्यांचा कार्यअहवाल वॉटस् अॅपवर क्लिपच्या स्वरुपात टाकला आहे. या क्लिपच्या माध्यमातून गुजराथी यांच्या कार्याचे विविध पैलू मतदारांसमोर आणण्यात आले आहेत. काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांबरोबर झालेल्या गाठीभेटींची क्षणचित्रे, पुण्याच्या प्रश्नांवर केलेली आंदोलने, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, पक्षाच्या विविध कार्यक्रमांतील सहभाग हे आणि असे अनेक विषय या क्लिपमध्ये पाहता येतात. ‘लगान’ चित्रपटातील ‘बार बार हाँ, बोलो यार हाँ, अपनी जित हो, उनकी हार हाँ..’ हे गीत या क्लिपसाठी वापरण्यात आले असून अडीच ते तीन मिनिटांच्या या क्लिपमधून योग्य तो संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे.

कार्यअहवाल वॉटस् अॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची कल्पना सुचल्यानंतर त्यावर काय प्रतिक्रिया येईल याचा अंदाज नव्हता; पण हा अहवाल अतिशय कमी वेळेत क्लिपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला आणि ही कल्पना आवडल्याचे बहुतेक सर्व जणांनी सांगितले. आम्हालाही असा अहवाल करून द्या, अशी विनंती इतरही काही उमेदवारांनी मला केली. या माध्यमाचा वापर किती प्रभावीपणे करता येऊ शकतो याचा अंदाज या प्रतिक्रियांमधून मला आला.
नितीन गुजराथी शहर चिटणीस, काँग्रेस</em>

Story img Loader