पुणे : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांनी गती घेतली असून ६७ हजार ७९५ संस्थाच्या निवडणुका झाल्या आहेत. दरम्यान, १६ हजार ७२३ पात्र सहकारी संस्थाच्या निवडणुका झालेल्या नसून त्यापैकी १ हजार ७०६ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये मुदत संपलेल्या ६ हजार ३४१ संस्थांच्याही निवडणूका येत्या काही दिवसात होणार आहेत.

सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या टप्प्यापासून सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात ३१ डिसेंबर २०२४ अखेर ८४ हजार ५१८ सहकारी संस्था निवडणुकीसाठी पात्र होत्या. त्यापैकी ६७ हजार ७९५ संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर प्रारूप मतदार यादी पूर्ण झालेल्या ७ हजार १४ आणि अद्यापही निवडणूक प्रक्रिया सुरू न झालेल्या ९ हजार ७०९ संस्थां अशा एकूण १६ हजार ७२३ संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत.

प्रारूप यादी प्रसिद्ध झालेल्या संस्थांमध्ये ३ हजार ५४३ संस्था ब वर्गातील आणि २ हजार ८१३ संस्था ड वर्गातील आहेत. अ वर्गात सर्वाधिक कमी १२ आणि ब वर्गात ६४६ संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मात्र, येत्या काही दिवसात त्यांच्या निवडणुका होतील, असा दावा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. यातील १ हजार ७०६ संस्थांची प्रक्रिया सुरू झाली असून नामनिर्देशन पत्र मागविण्यात आली आहेत.

निवडणूक प्रक्रिया सुरू न झाले्लया ९ हजार ७०९ संस्थांपैकी क वर्गातील ५ हजार ६६३, ड वर्गातील ३ हजार २३९ संस्थांचा समावेश आहे. अ आणि ब वर्गातील अनुक्रमे ४३ आणि ७६४ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली नाही.

निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्था- ८४ हजार ५१८

मतदान झालेल्या सहकारी संस्था- ६७ हजार ७९५

प्रारूप यादी जाहीर झालेल्या मात्र निवडणूक न झालेल्या संस्था- ७ हजार १४

नामनिर्देशन पत्र जाहीर झालेल्या संस्था- १ हजार ७०६

निवडणूक प्रक्रिया सुरू न झालेल्या संस्था- ९ हजार ७०९

राज्यातील १६ हजार ७२३ सहकारी संस्थांच्या निवडणुका अद्यापही बाकी आहेत. त्यांच्या निवडणूक प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण होईल. याशिवाय जानेवारी २०२५ मध्ये मुदत संपुष्टात आलेल्या ६ हजार ३४१ संस्थांच्याही निवडणुका घेतल्या जातील.- अशोक गाडे, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण