लोकसत्ता वार्ताहर
नारायणगाव : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उत्पादक सभासद प्रतिनिधी शिरोली बुद्रुक गट आणि इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटात निवडणूक प्रक्रिया होणार असून ४ जागांसाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी दिली .
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ६१ उमदेवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होईल अशी अटकळ होती. निवडणूक बिनविरोध होण्याचे शर्थीचे प्रयत्न अपयशी ठरले. उत्पादक सभासद प्रतिनिधी शिरोली बुद्रुक गटात उमेदवार इनामदार रहेमान अब्बास मोमीन यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या गटातील ३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या गटात इनामदार रहेमान अब्बास मोमीन, खैरे संतोष बबन, खोकराळे सुधीर महादू व विद्यमान चेअरमन सत्यशील सोपान शेरकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटात १ जागेसाठी इनामदार रहेमान अब्बास मोमीन, भुजबळ निलेश नामदेव, गडगे सुरेश भिमाजी हे निवडणूक रिंगणात आहेत. २१ पैकी १७ जागा बिनविरोध आल्याने विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. दोन गटातील निवडणूक मतदान १५ मार्च आणि मतमोजणी दि. १६ मार्च होणार आहे.