महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे नुकताच वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव जशाच्या तसा मंजूर झाल्यास सर्वसामान्य वीजग्राहकांवर त्याचा बोजा पडणार आहे. त्यामुळे प्रस्तावातील काही गोष्टींना कडाडून विरोध करण्यात येत आहे. त्यासाठी पुणेकरांच्या दहा हजार स्वाक्षऱ्या असणारे निवेदन सध्या तयार करण्यात येत असून, १० एप्रिलला वीजदरवाढीच्या प्रस्तावाबाबत राज्य वीज नियामक आयोगाकडून पुण्यात होणाऱ्या सुनावणीला हे निवेदन देण्यात येणार आहे.
वीजदरवाढीचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर राज्य वीज नियामक आयोगाच्या वतीने राज्यातील महसुली विभागात त्याबाबत सुनावणी घेण्यात येते. त्यात नागरिकांची, लोकप्रतिनिधींची बाजू समजावून घेतली जाते. त्या अनुषंगाने या वीजदरवाढीला विरोध करण्यासाठी सजग नागरिक मंचच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून, वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन प्रस्तावातील आक्षेपार्ह गोष्टी समजावून सांगितल्या जात आहेत. त्यातून जास्तीत जास्त वीजग्राहकांना स्वाक्षरी मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. वीजदरवाढ प्रस्तावातील विविध गोष्टींना विरोध करण्याबरोबरच काही सूचनाही निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
याबाबत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, स्थिर आकारामध्ये सुचवलेली वाढ ही पूर्णपणे चुकीची असल्याने ती आम्हाला मान्य नाही. घरगुती ग्राहकांसाठी १२५ युनिटपर्यंत चार रुपये प्रतियुनिटपेक्षा जास्त दर नसावा, तर १२५ ते २०० युनिटपर्यंत पाच रुपयांपेक्षा अधिक दर नसावा. महावितरणने दाखविलेल्या वीजगळतीपेक्षा प्रत्यक्ष गळती मोठी आहे. त्यामुळे खरी वीजगळती शोधण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट व्हावे. प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्यांवर वीजगळतीचा बोजा पडू नये म्हणून गळती जास्त असणाऱ्या भागात सरचार्ज लावावा, तर वीजगळती १५ टक्क्य़ांपेक्षा खाली आणू न शकणाऱ्या भागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के दंड आकारून त्याचा सहभाग महसुलात करावा. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची वीजदरवाढ होऊ नये. ही वाढ झाल्यास त्याचा भार शेवटी नागरिकांवरच पडणार आहे.  
स्वाक्षरी मोहिमेत सहभागासाठी
सामान्य वीजग्राहकांचे कंबरडे मोडणाऱ्या वीजदरवाढीला विरोध करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी स्वाक्षरीच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी pranku@vsnl.com या ई-मेलवर किंवा ‘सजग नागरिक मंच, १२०० सदाशिव पेठ, लिमये वाडी, पुणे-३०’ या पत्त्यावर संपर्क साधावा.

Story img Loader