रोज दीडशे ते सव्वादोनशे किलोमीटरचाच प्रवास
पुणे : विजेवर चालणाऱ्या (इलेक्ट्रीकल बस- ई-बस) गाडय़ांसाठी प्रत्येक किलोमीटरमागे तब्बल ४० रुपये या हिशेबाप्रमाणे लाखो रुपये मोजले जात असतानाही ई-बसची धाव मर्यादितच राहात असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. तीन ते चार तासांच्या चार्जिगनंतर प्रत्येक गाडी २२५ किलोमीटर प्रमाणे दोन सत्रात ४५० किलोमीटर धावणे अपेक्षित असताना या गाडय़ा दोन सत्रात जेमतेम दीडशे ते सव्वादोनशे किलोमीटर धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यावरणपूरक असलेल्या २५ ई-बस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. चिनी कंपनीच्या बीवायडी बनावटीच्या या गाडय़ांसाठी प्रत्येक किलोमीटरसाठी ४१ रुपये पीएमपी संबंधित कंपनीला देणार आहे. बेंगळूरुसह अन्य काही शहरात या कंपनीकडून ई-बस पुरविण्यात आल्या असून तेथे प्रतिकिलोमीटरसाठी देण्यात आलेला दर हा पुण्यातील दरापेक्षा कमी आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील एकूण २५ गाडय़ांपैकी १० गाडय़ा पिंपरी-चिंचवड शहरासाठी देण्यात आल्या असून १५ गाडय़ा पुण्यातील मार्गावर संचलनात आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवडकडील निगडी आगार आणि पुण्यातील हडपसर आगाराकडे असलेल्या या गाडय़ा किती धावल्या याचा तपशील डॉ. सुमेध अनाथपिंडिका आणि तुषार उदागे यांनी माहिती अधिकारात मागविला होता. त्यापैकी निगडी आगाराकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार गाडय़ांची धाव मर्यादित असल्याचे चित्र पुढे आले आहे.
निगडी आगाराकडे १० गाडय़ा आहेत. या प्रत्येक गाडीची दोन सत्रात मिळून ४५० किलोमीटर धाव होणे अपेक्षित आहे. दहा गाडय़ांचा विचार करता दररोज या गाडय़ांनी एकूण ४ हजार ५०० किलोमीटरचे अंतर कापणे अपेक्षित होते. या गाडय़ा फेब्रुवारीमध्ये ताफ्यात आल्यानंतर १२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या सोळा दिवसांच्या कालावधीत या गाडय़ांनी एकूण ७६ हजार ५०० किलोमीटर अंतर धावणे अपेक्षित होते. मात्र ही धाव ३४ हजार २७८ किलोमीटर पर्यंतच मर्यादित राहिली आहे. गाडय़ा ताफ्यात आल्यानंतरही पहिले काही दिवस या गाडय़ा मार्गावर आल्या नव्हत्या, असेही माहिती अधिकारातून पुढे आले आहे. या सोळा दिवसांत ई-बसच्या ६० फेऱ्या रद्द झाल्या.
१ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत ६२० फेऱ्यांपैकी ७ फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या. या गाडय़ांची धाव एकूण १ लाख ३९ हजार ५०० किलोमीटर होण्याऐवजी ती ७४ हजार ६३३ किलोमीटर झाली. त्यामुळे ५३ टक्के गाडय़ांना २२५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करता आलेले नाही, हे वास्तवही पुढे आले. एप्रिल महिन्यातही ई-बसची अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.
अपेक्षित धाव नाही
तीन ते चार तासांच्या चार्जिगसाठी पीएमपीला प्रती युनिट आठ रुपये खर्च येत आहे. हा खर्च करून एक गाडी एका चार्जिगनंतर २२५ किलोमीटर धावेल, असे सांगण्यात येत होते. त्यासाठी कंपनीला प्रत्येक किलोमीटरसाठी ४१ रुपये या प्रमाणे ताफ्यातील २५ गाडय़ांसाठी दिवसाला २ लाख ३० हजार ६२५ रुपये मोजण्यात येत आहेत. मात्र प्रतिदिन लाखो रुपये खर्च करूनही या गाडय़ा अपेक्षित अंतर धावत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुन्हा तोच प्रकार
पीएमपीच्या ताफ्यात खासगी ठेकेदारांकडून काही गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यातील एकूण गाडय़ांपैकी ठेकेदाराकडून घेतलेल्या गाडय़ांची संख्या निम्मी आहे. मात्र ठेकेदारांच्या गाडय़ा रस्त्यावर येत नाहीत, तरीही त्यांना पैसे मोजण्यात येतात, असा आरोप सातत्याने स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आला आहे. हाच प्रकार ई-बस बाबतही होतो की काय, अशी शंका त्यामुळे उपस्थित झाली आहे.
नऊ मीटर लांबीच्या या गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या गाडय़ांची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये गाडी अपेक्षित धाव पूर्ण करत असल्याचे दिसले. सध्या एका चार्जिगमध्ये एक गाडी १८० किलमीटपर्यंतचे अंतर कापत आहे. आणखी ३० मिनिटांच्या चार्जिगनंतर ५० किलोमीटर पर्यंत वाढीव धाव घेतली जात आहे. त्यामुळे गाडय़ांची सरासरी धाव कमी होत नाही.
– सुनील बुरसे, मुख्य अभियंता, पीएमपी