पुणे : विद्युत वाहने सर्वत्रच वाढत असल्याने पुढील दोन ते तीन वर्षांत राज्यभरात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्थानके उभी राहतील. एकात्मिक बांधकाम नियमावलीनुसार सरकारी कार्यालये, मॉल, व्यावसायिक संकुले, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वाहनतळाच्या तीस टक्के जागेवर चार्जिंगची सुविधा बंधनकारक केली जाणार आहे, राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी सांगितले. पर्यायी इंधनांवरील वाहने वाढण्यासाठी केंद्र सरकारच्या वाहने निकाली काढण्याच्या (स्क्रॅपिंग ) धोरणाची राज्यात लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्य सरकार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (एमसीसीआयए) यांच्यातर्फे आयोजित पुणे पर्यायी इंधन परिषदेअंतर्गत (पुणे एएफसी) सिंचननगर मैदानावरील पर्यायी इंधनांवरील वाहन प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ठाकरे बोलत होते. राज्याचे प्रधान सचिव आशुष कुमार सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, एमपीसीबीचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर काही कंपन्यांच्या नव्या वाहनांचे सादरीकरण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘राज्याचे विद्युत वाहन धोरण, इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर, पर्यायी इंधनाची उपलब्धता आणि प्रदूषणमुक्तीमुळे अनेक उद्योग राज्यात येत असून, त्यामुळे रोजगार वाढतील. पर्यायी इंधनावरील सार्वजनिक वाहनांमुळे पुणे, मुंबईसारख्या महापालिकांच्या परिवहन मंडळांचा पेट्रोल-डिझेलवरील खर्च कमी होऊन, त्यांचा नफा वाढेल. तसेच इलेक्ट्रि पर्यायी इंधनावर आधारित वाहन क्षेत्रातील नवउद्यमींच्या क्षमता वृद्धीवरही भर दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगचे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहेत. बॅटरी अदलाबदल, पर्यायी इंधन पुरवठा स्थानके आदी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील, असे ठाकरे यांनी सांगितले.
राज्यातील तीनचाकी चांगली
राज्यात राजकीय प्रदूषण वाढले आहे का, या प्रश्नावर राज्यात तीनचाकी चांगली सुरू असल्याचे सांगत ठाकरे यांनी राजकीय भाष्य करणे टाळले. ‘महागाईबद्दल मी काही बोललो तर राजकीय अर्थ काढला जाईल. पण विद्युत वाहनांच्या चार्जिंगचा खर्च हा पेट्रोल-डिझेलच्या दराच्या तुलनेत अत्यंत कमी आहे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यायी इंधनांवरील वाहनांचे प्रदर्शन राज्यभरात नेण्याचा प्रयत्न
पुणे परिसरात पर्यायी इंधनावरील वाहनांचे उत्पादन करणारे, या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत आहेत. भविष्यात पर्यायी इंधनावरील वाहनांच्या क्षेत्रात पुणे नेतृत्त्व करेल आणि इतरांना पुण्याचे अनुकरण करावे लागेल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. पर्यायी इंधनावरील वाहनांचे प्रदर्शन पुण्यात होत असले, तरी येत्या काळात पर्यायी इंधनांवरील वाहनांचे प्रदर्शन राज्यभरात नेण्याचा प्रयत्न असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.