‘महावितरण’ ने ‘गो-ग्रीन’ या योजनेअंतर्गत सर्व लघुदाब ग्राहकांना छापील वीजबिलाऐवजी आता ई-मेलद्वारे वीजबिले देण्याचा पर्याय दिला आहे. ई-बिलाचा हा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना वीजबिलामध्ये तीन रुपयांची सूटही दिली जाणार आहे.
ग्राहकसेवेत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर सध्या ‘महावितरण’कडून भर देण्यात येत आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. घरबसल्या कोणत्याही ठिकाणाहून वीजबिलाचा भरणा करता येत असल्याने या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा एक भाग म्हणून आता ई-मेलद्वारे वीजबिल पाठविण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. कागदनिर्मितीसाठी होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व पेपरलेस कार्यालयाच्या संकल्पनेनुसार ही योजना राबविण्यात येत आहे.
ई-बिलाचा पर्याय स्वीकारणाऱ्यांना छापील बिल पाठविले जाणार नाही. त्याचबरोबर त्यांना तीन रुपयांची सूटही दिली जाणार आहे. ‘महावितरण’च्या ६६६.ेंँं्िर२ूे.्रल्ल  या संकेतस्थळावर गेल्यास गो-ग्रीन या रकान्यात ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट क्रमांकाची माहिती भरून ‘सबमिट’ केल्यास दुसरे पान खुले होईल. त्यात ग्राहकाचे नाव व पत्ता दर्शविलेला असेल. या पानावरील एका रकान्यात १५ अंकी गो-ग्रीन क्रमांक व दुसऱ्या रकान्यात ई-मेल भरावा. (गो-ग्रीनचा क्रमांक सध्या सर्व ग्राहकांच्या छापील वीजबिलांवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.) यानंतर ई-मेलवर वीजबिल मिळण्याच्या योजनेत संबंधित ग्राहकाचा समावेश करण्यात येईल.

लघुदाब ग्राहकांना ‘एसएमएस’वर वीजबिल
राज्यातील सर्व ग्राहकांना आता त्यांच्या वीजबिलाची माहिती मोबाईलच्या माध्यमातून एसएमएसवर देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन एसएमएसच्या रकान्यात ग्राहक क्रमांक व मोबाईल क्रमांकाची माहिती भरावी लागणार आहे.

Story img Loader