‘ऑक्टोबर हिट’च्या दिवसांपेक्षाही अधिक मागणी
सध्या थंडीचे दिवस सुरू असले, तरी राज्यातील विजेची मागणी मात्र उन्हाळ्याच्या दिवसांप्रमाणे वाढली आहे. मागील काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास हिवाळा आणि पावसाळ्याच्या कालावधीत १४ ते १६ हजार मेगावॉटपर्यंत विजेची मागणी नोंदविली जाते. मात्र, सद्य:स्थितीत ही मागणी १८ हजार मेगावॉटच्या आसपास गेली आहे. ‘ऑक्टोबर हिट’च्या दिवसांपेक्षाही ही मागणी अधिक आहे. कोळशाची समस्या काही प्रमाणात कायम असली, तरी जलविद्युत आणि इतर स्रोतांवर भर देऊन ही मागणी भागविण्यात येत असल्याने सध्या तरी पुरवठय़ाबाबत चिंता नाही.
राज्यामध्ये यंदाच्या ‘ऑक्टोबर हिट’च्या कालावधीत ४ ते ६ ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यातील सर्वाधिक १७,८०० मेगावॉट विजेची मागणी नोंदविली गेली होती. याच काळात देशभरात कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने आणि वीजनिर्मितीचे काही प्रकल्प दुरुस्ती-देखभालीसाठी बंद असल्याने विजेची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. त्या वेळी विजेची उपलब्धता १५,७०० मेगावॉट होती. त्यामुळे २१०० ते २२०० मेगावॉट विजेची तूट निर्माण झाल्याने राज्यभरात वीजकपात करण्यात आली. मात्र, त्यानंतर परतीचा मान्सून चांगला बरसल्याने विजेची मागणे थेट चार हजार मेगावॉटने कमी होऊन ती १४ हजारांपर्यंत खाली आली.
मान्सून परतल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या कालावधीत १५ ते १६ हजार मेगावॉटपर्यंत विजेची मागणी गेली. नव्या वर्षांच्या सुरुवातीपासून राज्याच्या विविध भागात कडाक्याची थंडी पडल्याने मागणीत काहीशी घट झाली होती. मात्र, थंडीचा कडाका काहीसा कमी होताच सध्या विजेची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. विजेच्या रोजच्या मागणीबाबत महावितरणकडून जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीनुसार १७ हजार ९०० ते १८ हजारांच्या आसपास सध्या विजेची मागणी नोंदविली जात असून, ती यंदाच्या ‘ऑक्टोबर हिट’पेक्षाही अधिक आहे. सध्या थंडीचा कडाका कमी झाला आहे. बहुतांश भागातील किमान आणि कमाल तापमान वाढले आहे. दुपारी काही प्रमाणात उकाडा जाणवत असल्याने विजेच्या मागणीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
कोयनेतून मोठय़ा प्रमाणात वीजनिर्मिती
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला विजेची वाढलेली मागणी आणि कोळशाच्या टंचाईमुळे राज्यात विजेचे संकट निर्माण झाले असतानाही जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात नसल्याबाबत त्या वेळी आक्षेप घेण्यात येत होता. सध्या विजेची मागणी प्रचंड आहे, त्याचप्रमाणे कोळशाच्या समस्येमुळे अद्यापही काही प्रकल्प बंद आहेत. मात्र, मागील काही दिवसांत कोयना प्रकल्पातून सुमारे १६०० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे. त्याचप्रमाणे काही प्रकल्पांतून वाढीव वीजनिर्मिती करण्यात येत असून, बाजारातूनही आवश्यकतेनुसार विजेची खरेदी केली जात असल्याने मागणी वाढूनही पुरवठय़ाची समस्या नाही.