पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोमध्ये उभारलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्पात दीड वर्षात दाेन लाख ५७ हजार ८१९ टन कचरा जाळून १३ काेटी ८२ लाख ४० हजार युनिट वीज निर्माण करण्यात आली आहे. विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने हा उपक्रम साकारला असून, ही वीज महापालिकेच्या विविध कार्यालयांत वापरली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दररोज ८०० टन सुका आणि ४०० टन ओला, असा एकूण १२०० टन कचरा संकलित होतो. घंटागाडीच्या माध्यमातून हा कचरा मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये आणला जातो. येथे ८१ एकर जागेवर कचरा डेपो विस्तारला आहे. त्या ठिकाणी कम्पोस्टिंग, गांडूळ खत, प्लास्टिकपासून इंधन निर्मिती असे विविध प्रकल्प कार्यान्वित आहेत. घनकचरा विघटनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर उभारण्यात आला आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून २१ वर्षे कालावधीसाठी प्रकल्प चालविला जाणार आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात एक हजार टन कचऱ्यापासून दररोज १४ मेगावॅट वीजनिर्मिती हाेत आहे.

महापालिकेच्या वीज देयकात ३० टक्के बचत

या प्रकल्पामुळे शहरातील वाढत्या कचऱ्याची समस्याही मार्गी लागत आहे. गेल्या दीड वर्षात दाेन लाख ५७ हजार ८१९ टन कचरा जाळण्यात आला आहे. या कचऱ्यापासून १३ काेटी ८२ लाख ४० हजार युनिट वीज निर्माण झाली. यामधील १२ काेटी २४ लाख ५० हजार १४७ युनिट वीज महावितरणला देण्यात आली आहे. महावितरणकडून ही वीज प्रति युनिट पाच रुपये दराने महापालिकेस उपलब्ध हाेत आहे. ही वीज महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्र, मैला शुद्धीकरण केंद्र आणि रुग्णालयांमध्ये वापरण्यात येत आहे. यामुळे महापालिकेच्या वीज देयकात ३० टक्के बचत हाेत असल्याचा दावा प्रशासनाचा आहे. हा प्रकल्प चालविण्यासाठी दोन मेगावॅट वीज लागत आहे.

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेने स्वच्छता, पर्यावरण रक्षण आणि शाश्वत ऊर्जानिर्मितीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाच्या आधारे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. कचरा समस्या कमी होण्यास मदत होत आहे. महापालिकेच्या वीज देयकांमध्येही भरीव बचत होत आहे. – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका