पुणे : डीएसके विश्व परिसरात जलवाहिनीसाठी जेसीबीद्वारे सुरू असलेल्या खोदकामात सोमवारी (२८ मार्च) दुपारी महावितरणची उच्चदाब क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तोडली. परिणामी डीएसके उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडल्याने धायरी गाव, डीएसके विश्व, रायकर मळा, सिंहगड रस्त्याच्या काही भागातील सुमारे २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदेड सिटी वीज उपकेंद्रातून राजयोग उच्चदाब भूमिगत वाहिनीद्वारे महावितरणच्या डीएसके उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. या परिसरात जलवाहिनीसाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू आहे. त्यामध्ये ही राजयोग वीजवाहिनी तोडण्यात आल्याने डीएसके उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद पडला. परिणामी या उपकेंद्रातून निघणाऱ्या चारही वीजवाहिन्यांवरील धायरी गाव, रायकर मळा, डीएसके विश्व आणि सिंहगड रस्त्याचा काही भाग या परिसरातील वीजपुरवठा दुपारी दीडपासून वाजता खंडित झाला. यातील आणखी एका प्रकारात डीएसके विश्व येथील महावितरणच्या रिंगमेन युनीटजवळ आग लागल्याने तेथील वीजवाहिन्यांना मोठी झळ बसली.

हेही वाचा : पिंपरी चिंचवड: महापारेषण उपकेंद्रात बिघाड; भोसरी, आकुर्डीमधील ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद

महावितरणचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तातडीने तांत्रिक उपाययोजना केली. दुपारी ४.१५ वाजता सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरू केला होता. मात्र, सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पर्यायी व्यवस्थेमधील एक वीजतार तुटल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत तोडलेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर चाचणी घेऊन रात्री ८.१५ वाजेपर्यंत सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity lines break due to excavation work in pune 25 thousand consumer affected pune print news pbs