महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागांत वीजचोरांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील दोन मोठ्या प्रकरणांत वीज मीटर टाळून विजेच्या वापरातून लाखो रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. एकूण प्रादेशिक विभागात महिन्यामध्ये साडेतीन कोटी रुपयांहून अधिक वीजचोरीच्या १७५ प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे. उघडकीस आलेल्या वीजचोरीमध्ये औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांचा प्रामुख्याने समावेश आहे.
हेही वाचा >>> पुणे: रितेश कुमार यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे; मावळेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून पदभार
वीजचोरीच्या संशयावरून उरुळी कांचन भागातील एका पेट्रोल पंपावर महावितरणच्या भरारी पथकाने छापा घातला. या पंपावर ग्राहकाने मीटरला टाळून वीज वापराची तांत्रिक व्यवस्था केली होती. या प्रकरणाने पंप व्यावसायिकाने ९० हजारांहून अधिक युनिटची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. या ग्राहकास १९.४२ लाख रुपयांचे वीज देयक देण्यात आले आहे. पुण्यातीलच दुसऱ्या एका प्रकरणात एका व्यावसायिकाची वीजचोरी पकडण्यात आली. या ग्राहकानेही मीटरच्या आधीच वीजवाहिनीतून वीज घेऊन तिचा वापर केल्याचे दिसून आले. या ग्राहकाने ८० हजाराहून अधिक युनिटची वीज चोरल्याचे उघड झाले. त्याला दंडासह २८ लाख १४ हजार रुपयांचे वीज देयक आकारण्यात आले आहे.
हेही वाचा >>> पुणे: लेफ्टनंट कर्नल पुरोहितांवरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी
पुणे प्रादेशिक विभागातील कोल्हापूर आणि सोलापूर येथेही मोठ्या वीजचोऱ्या पकडण्यात आल्या आहेत. इचलकरंजीतील औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये छेडछाड करून ९० हजार युनिट, तर नातेपुते येथील औद्योगिक ग्राहकाने थेट ट्रान्सफार्मरमधूनच वीजचोरी केल्याचे दिसून आले. त्याने सुमारे ७० हजार युनिट वीज चोरली. या दोन्ही प्रकरणात २६ लाखांहून अधिकचे वीज देयक देण्यात आले आहे. दिलेले वीज देयक न भरल्यास संबंधितांवर वीज कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
कारवाई सुरूच राहणार
वीजचोरांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्याच्या सूचना महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार ही कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. सुरक्षा, अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार आणि त्यांचे पथक पुणे प्रादेशिक विभागातील वीज चोरीच्या प्रकारांवर लक्ष ठेवून आहेत. वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये दंडाबरोबरच कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.