पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाचे मासिक वीज देयक सरासरी १ कोटी रुपये आहे. हा खर्च कमी करण्यासाठी ससून रुग्णालय प्रशासनाने पाऊल उचलले आहे. महाविद्यालयासह रुग्णालयाच्या छतावर सौरपॅनेल बसवून ऊर्जानिर्मिती केली जाणार आहे. या माध्यमातून पुढील पाच वर्षांत विजेचा खर्च निम्म्याने कमी करण्याची योजना आखण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयासह रुग्णालयाचे मासिक वीज देयक वाढले आहे. हे कमी करण्याबाबत प्रशासनाकडून विचार सुरू होता. अखेर महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या छतावर सौरपॅनेल बसवून सौरऊर्जा निर्मितीचा प्रस्ताव पुढे आला. एका खासगी कंपनीने हे सौरपॅनेल बसवून देण्याची तयारी दर्शविली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या छतावर सौरपॅनेल बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर आमचे वीज देयक ८ ते १० लाख रुपयांनी कमी होईल, असे महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा-दिल्लीतील साहित्य संमेलन अभूतपूर्व ठरेल, प्रतिभा पाटील यांचा विश्वास
महाविद्यालय आणि रुग्णालयातील सौरऊर्जा प्रकल्प टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होईल. पहिल्या वर्षी ८ ते १० टक्के बचत केली जाईल. नंतर प्रत्येक वर्षी सुमारे १० टक्के बचत केली जाईल. यानुसार पाच वर्षांत एकूण वीज वापरापैकी सुमारे ५० टक्के सौरऊर्जेचा वापर केला जाईल. त्यामुळे मासिक वीज देयकात ५० टक्क्यांपर्यंत घट होईल. सध्या महाविद्यालयाला मासिक सुमारे १ कोटी रुपयांचे वीज देयक येते. पुढील पाच वर्षांत हे मासिक वीज देयक ५० लाख रुपयांवर आणण्यात येईल, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.
एक रुपयाही खर्च नाही!
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी प्रशासनाला एकही रुपया खर्च करणार नाही. खासगी कंपनीकडून महाविद्यालय आणि रुग्णालयात हा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. कंपनी यासाठी कोणतेही शुल्क घेणार आहे. सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून कंपनी हे काम करणार आहे. यामुळे प्रशासनाला कोणताही खर्च न करता वीज देयकामध्ये मोठी बचत करता येणार आहे.
आणखी वाचा-पुणे : पिस्तूल बाळगणारा मुंबईतील सराइत गजाआड, पिस्तुलासह काडतूस जप्त
विजेचा वापर करून अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात सौरऊर्जेचा वापर करणार आहोत. यातून विजेचा वापर कमी होऊन खर्चात बचत होण्यासोबत पर्यावरण संरक्षणही होईल. -डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालय
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय
महिना | विजेचा वापर (युनिट) | विजेचे देयक (रुपयांत) |
सप्टेंबर | १ लाख ८० हजार ६४० | ८४ लाख ११ हजार ५४० |
ऑक्टोबर | २ लाख | ९२ लाख ४३ हजार २०० |
नोव्हेंबर | १ लाख ६३ हजार ९६० | ७६ लाख १७ हजार ४२० |