पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १५ पदांच्या ३८८ जागांसाठी झालेल्या परीक्षेत तीन केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले. परीक्षार्थींच्या कानात सूक्ष्म ‘इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस कनेक्टर’ आढळून आले. एकाने बदली (डमी) परीक्षार्थी बसविला होता. याप्रकरणी मुंबई, नाशिकमध्ये पाच जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा >>> पुणे:नैसर्गिक आपत्तींमुळे पिके मातीमोल, खरिपातील ४७ टक्के पिकांवर पाणी
नाशिक केंद्रावर झालेल्या गैरप्रकार प्रकरणी महापालिकेचे अधिकारी नाना मोरे यांनी नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल मोहन नागलोथ, अर्जुन हारसिंग मेहेर आणि अर्जुन रामधन राजपूत (तिघे रा. औरंगाबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मूळ परीक्षार्थी हा मेहेर असताना त्याच्या जागी नागलोथ हा परीक्षेसाठी बसला होता. नागलोथ हा बदली परीक्षार्थी कानात डिव्हाईसव्दारे प्रश्न सांगून उत्तर ऐकत होता. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कानात लहान असे डिव्हाईस सापडले. त्याच्याकडून दोन सिमकार्ड, एक मेमरी कार्ड जप्त केले. त्याच्यासह फोनवरून उत्तरे सांगणाऱ्या राजपूत, मूळ परीक्षार्थी मेहेर याच्यावर गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला,कॅप प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवडय़ात
मुंबई केंद्रावरील कॉपीप्रकरणात अभियंता संजय चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सखाराम अंबादास बहीर (रा. शिरपूर, बीड) आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सखाराम हा डिव्हाईसव्दारे कॉपी करत असल्याचे आढळून आले. अंगझडती घेण्यापूर्वीच त्याने मोबाइल खाली फेकून दिला. दोन्ही घटनांचा नाशिक आणि मुंबई पोलीस तपास करत आहेत. दोघेही लिपिक पदासाठी परीक्षा देत होते. आरोपींनी कागदामध्ये गुंडाळून डिव्हाईस, मोबाइल फोन केंद्रामध्ये नेला होता. केंद्रावर जॅमर बसविला असतानाही आरोपींनी मोबाइल फोन आतमध्ये नेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आणखी एका केंद्रावर एका परीक्षार्थींकडे कागद सापडला आहे.
१५ दिवसांत निकाल
महापालिकेच्या ३८८ जागांसाठी २६ ते २८ मे रोजी राज्यातील २६ जिल्ह्यांतील ९८ केंद्रांवर परीक्षा झाली. अर्ज केलेल्या ८५ हजार ३८७ पैकी ५५ हजार ८२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. सहायक उद्यान अधीक्षक पदासाठीचे आरक्षण बदलामुळे ८९ उमेदवारांचे पैसे परत दिले जाणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षेला बसलेल्या आणि महापालिकेच्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या ८३ परीक्षार्थींची लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. १५ दिवसांत निकाल जाहीर होणार आहे.